मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
गरिबी, वडिलांचे अकाली निधन आणि खेळताना झालेला हाताचा फ्रॅक्चर… संकटांची मालिकाच आयुष्यात उभी राहिली. मात्र या सर्वांवर मात करत “मै झुकेगा नाही” हा जिद्दीचा मंत्र जपणारा मंद्रूपचा पैलवान म्हणजे सागर मारुती शेजाळ. ऑल इंडिया चॅम्पियन, महाराष्ट्र चॅम्पियन आणि कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत चमकलेला सागर आजही प्रतिकूल परिस्थितीतून यशाची शिखरे गाठण्याचा प्रयत्न करत आहे.
घरात कुस्तीचा कोणताही वारसा नसतानाही लहानपणापासून सागरला कुस्तीची ओढ होती. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आणि मंद्रूपच्या नावाची नोंद राष्ट्रीय पातळीवर झाली.
सागरचे वडील मारुती शेजाळ हे मंद्रूप पोलीस ठाण्यात साफसफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ३० जुलै २००८ रोजी अपघाती निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई लक्ष्मी शेजाळ आणि मोठे भाऊ सोमनाथ व कृष्णा यांनी कष्ट करून सागरच्या स्वप्नांना आधार दिला.
सागरची जिद्द ओळखून मा. गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी स्वतःच्या खर्चाने त्याला फडात उतरवले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात झाले. प्राचार्य श्रीधर टिळे, नंदकुमार टिळे आणि प्रसाद शेंडगे यांनी शिक्षणाचा खर्च उचलत त्याला भक्कम साथ दिली.
शालेय स्तरावर सागरने पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेत सलग तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावला. कुमार महाराष्ट्र केसरी आणि खाशाबा जाधव स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी केली. मंद्रूप पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे व संदीप धांडे यांनी आर्थिक मदत व मार्गदर्शन करत त्याला प्रोत्साहन दिले.
२०१० साली भारतीय रेल्वेचे कुस्तीपटू आबासाहेब उर्फ बापू मदने यांनी सागरला पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील काकासाहेब पवार यांच्या तालमीत दाखल केले. तेव्हापासून त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.
२०१९ मध्ये कुस्ती खेळताना सागरच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. पुण्यातील भारतीय हॉस्पिटलमध्ये वर्षभर उपचार घ्यावे लागले. उपचाराचा सर्व खर्च आबासाहेब मदने यांनी केला. मात्र या कठीण काळातही सागरचा सराव खंडित झाला नाही.
सध्या उदरनिर्वाह व खुराकासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागत आहे. मंद्रूपचे राधा ज्वेलर्सचे सतीश वेर्णेकर गेली तीन वर्षे दरमहा पाच हजार रुपये मानधन देत आहेत. गावोगावी यात्रा-जत्रांतील कुस्ती मैदानात खेळून मिळणाऱ्या बक्षिसांतून सागर वर्षभराचा खर्च भागवतो.
मंद्रूपमध्ये उभारलेल्या भव्य आखाड्यामुळे अनेक पैलवान घडले असले, तरी आर्थिक अडचणींमुळे काही खेळाडू मागे पडतात. सागर शेजाळसारख्या जिद्दी व होतकरू पैलवानाला लोकसहभागातून भक्कम आधार मिळण्याची गरज व्यक्त होत आहे.
जिद्द, चिकाटी आणि संघर्ष यांच्या जोरावर सागर शेजाळने सिद्ध केले आहे की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नांवर विश्वास ठेवणारा पैलवान कधीच झुकत नाही.



0 Comments