बरूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : दक्षिण तालुक्यातील बरूर येथील ‘श्री आदिशक्ती फायनान्स’ या संस्थेच्या माध्यमातून आकर्षक २४ टक्के वार्षिक व्याजदराचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ११ लाख १७ हजार ६३० रुपये रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बरूर व परिसरात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात निर्मला गणेश चौगुले (वय ५०, रा. बरूर, ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार आरोपी प्रकाश मुकुंदा इटकर (मयत) व संजय प्रकाश इटकर (रा. बरूर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी सन २०२० ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ‘श्री आदिशक्ती फायनान्स’ संस्था स्थापन करून ठेवीदारांना २४% वार्षिक व्याजाचे आमिष दाखवले. परवान्यातील अटींचा भंग करून पिग्मी व रोख स्वरूपात ठेवी स्वीकारल्या.
फिर्यादीसह एकूण ४८ ठेवीदारांकडून वेगवेगळ्या मुदतठेवींच्या स्वरूपात १,११,१७,६३०/- रुपये जमा करून घेतले. मात्र मुदत संपल्यानंतरही मूळ रक्कम व व्याज परत न करता आरोपींनी विश्वासघात करून अपहार केल्याचा आरोप आहे.
कोणकोणत्या कायद्यांखाली गुन्हा?
दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.४५ वाजता मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४/२०२६ दाखल करण्यात आला असून खालील कलमांनुसार कारवाई सुरू आहे—
भारतीय दंड संहिता १९६० चे कलम ४१८, ४२०, ४०६, ३४
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कलम ३९
महाराष्ट्र ठेवीदारांचा (वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ चे कलम ३
तपास सुरू:
या गुन्ह्याची नोंद ASI पाटील यांनी केली असून तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक पटवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
पोलीसांकडून ठेवीदारांची यादी व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी पीडित समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंद्रूप पोलीस ठाण्याचे आवाहन : अशा प्रकारच्या आकर्षक व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थेची वैधता व परवाना तपासावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments