Advertisement

Breaking News
Loading...

कुंभारीत ‘मराठी’चा जागर आणि ‘विज्ञान’ाचा जल्लोष; विद्यार्थ्यांची बहारदार सांस्कृतिक मेजवानी...

 


फोटो कॅप्शन :

कुंभारी येथील श्री गेनसिद्ध प्रशालेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ व ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरे करताना मुख्याध्यापक व शिक्षकवृंद.

कुंभारी | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

कुंभारी येथील श्री गेनसिद्ध प्रशाला येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात साजरे करण्यात आले. या दुहेरी औचित्याने इयत्ता आठवी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात मराठी भाषेच्या अभिमानगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य आणि प्रभावी भाषणांच्या माध्यमातून मराठी भाषेचा समृद्ध वारसा आणि विज्ञानाची प्रगती यांचा सुरेख संगम सादर केला. विशेषतः सादर केलेल्या नाटकातून “मराठी भाषेचे जतन ही काळाची गरज आहे” हा संदेश अत्यंत प्रभावीपणे देण्यात आला.

मराठी विभाग प्रमुख व विषय शिक्षिका श्रीमती बहिर्जे ए. टी. यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये भाषाभिमान जागृत केला. त्या म्हणाल्या, “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपल्या भावजीवनाला आधार देणारी आईसमान मातृभाषा आहे. तिच्याशी जिव्हाळ्याचे नाते ठेवून तिचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.”

कार्यक्रमाचे नेटके नियोजन श्रीमती बहिर्जे यांनी केले. सहशिक्षक विश्वेश्वर करकी यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले. मुख्याध्यापक रमेश बसुदे पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मातृभाषेवरील प्रेम या दोन्हींचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांच्या परिश्रमामुळेच कार्यक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आदर आणि विज्ञानाविषयी जिज्ञासा अधिक दृढ झाली असून, प्रशालेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




Post a Comment

0 Comments