सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज|मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्या वतीने आज पोलीस मुख्यालय, संवाद हॉल येथे फॉरेन्सिक सायन्स व फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
सदर कार्यशाळेसाठी संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक येथील तज्ज्ञ श्रीमती युक्ता गुबलोत यांनी प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सुमारे १०० अधिकारी व अंमलदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणादरम्यान गुन्हे तपासात फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्व, घटनास्थळी पुरावे जतन करण्याची योग्य पद्धत, फिंगरप्रिंट डेव्हलपमेंट तंत्रज्ञान, वैज्ञानिक तपास पद्धती तसेच तपास करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गुन्ह्यांचा उलगडा जलद व अचूक पद्धतीने कसा करता येतो, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले की, वैज्ञानिक तपास पद्धतींचा प्रभावी वापर केल्यास गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढते आणि न्यायालयीन प्रक्रियेत भक्कम पुरावे सादर करता येतात. सर्व अधिकारी व अंमलदारांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष कामकाजात उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, वाचक पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले, अंगुली मुद्रांक शाखेचे फिंगरप्रिंट एक्सपर्ट पोलीस निरीक्षक सत्यम गाडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेमुळे सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या तपास प्रक्रियेला अधिक वैज्ञानिक आणि सक्षम दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




0 Comments