पंढरपूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर : पंढरपूर शहरात ट्रक चालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची कडक कारवाई केली आहे.
दिनांक ३ मार्च २०२६ रोजी पंढरपूर शहरातील मंगळवेढा नाका येथे वाहतूक पोलिसांनी एका ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा मुद्दा राज्याच्या विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान संबंधित दोन पोलीस अंमलदारांनी कर्तव्यावर असताना बेशिस्त वर्तन केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोघांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.
पोलिस दलाची प्रतिमा स्वच्छ आणि पारदर्शक राहावी तसेच सर्वसामान्य नागरिकांशी पोलीस कर्मचाऱ्यांनी संयमाने व कायद्याच्या चौकटीत राहून वागावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिनस्तांना दिल्या आहेत. कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा नागरिकांशी अयोग्य वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून, अशा प्रकारच्या गैरवर्तनाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असेही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.




0 Comments