बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक : डॉ. राजदत्त रासोलगीकर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान – समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत शेकडो नागरिकांच्या प्रलंबित कामांचा जागीच निपटारा करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या शिबिराच्या निमित्ताने बोरामणीचे माजी पंचायत समिती सदस्य धनेश अण्णा अचलारे यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या वतीने दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सन्मानपूर्वक सत्कार केला. महसूल विभागाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोरामणीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित या समाधान शिबिरात नागरिकांच्या अनेक प्रशासकीय कामांचा तत्काळ निपटारा करण्यात आला. यामध्ये 7/12 दुरुस्ती, फेरफार नोंदी निर्गत करणे, विद्यार्थी दाखले, विविध प्रमाणपत्रे, निराधार योजनेची कागदपत्रे, घरकुल बांधकामासाठी वाळू पावती वाटप, नवीन बिनशेती प्रकरणे तसेच डिजिटल 7/12 व खातेउतारे वाटप अशा विविध सेवांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.
याशिवाय पशुसंवर्धन, कृषी, पोलीस, महावितरण, महापारेषण, ग्रामविकास आणि आरोग्य विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिरात सहभाग घेत नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन केले. प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी शिबिराला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शासनाच्या या उपक्रमामुळे अनेक नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


.jpg)

0 Comments