निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्र देताना व्यासपीठावर उपस्थित मान्यवर...
बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान – समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत शेकडो नागरिकांच्या प्रलंबित कामांना गती देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या शिबिराचे उद्घाटन बोरामणी जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित सदस्य नेताजीभाऊ खंडागळे व बोरामणी पंचायत समिती सदस्य विजय उमाकांत राठोड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी बोरामणीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांच्या अनेक प्रशासकीय कामांचा जागीच निपटारा करण्यात आला. यामध्ये 7/12 दुरुस्ती, फेरफार नोंदी निर्गत करणे, विद्यार्थी दाखले, विविध प्रमाणपत्रे, निराधार योजनेची कागदपत्रे, घरकुल बांधकामासाठी वाळू पावती वाटप, नवीन बिनशेती प्रकरणे, डिजिटल 7/12 व खातेउतारे वाटप अशा विविध सेवांचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.
याशिवाय पशुसंवर्धन, कृषि, पोलीस, महावितरण, महापारेषण, ग्रामविकास आणि आरोग्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांनीही शिबिरात सहभाग घेत नागरिकांना विविध सेवा व शासकीय योजनांची माहिती दिली.
दरम्यान, प्रांताधिकारी सुमित शिंदे यांनी शिबिराला भेट देत कामकाजाचा आढावा घेतला व नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
“दक्षिण तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित या समाधान शिबिराचा माझ्या मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविल्या जात असल्याने समाधान वाटते.”
— नेताजीभाऊ खंडागळे, जिल्हा परिषद सदस्य, बोरामणी
“छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या रयतेची काळजी घेणाऱ्या महापुरुषाच्या नावाने सुरू झालेल्या या समाधान शिबिराचे तहसील कार्यालयाने उत्कृष्ट नियोजन केले. शिबिरात सहभागी प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.”
— विजय उमाकांत राठोड, पंचायत समिती सदस्य


0 Comments