Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- १९७ नातं भाऊबहिणीचं...!!

 

रविवारचा चहा क्रमांक- १९७

 नातं भाऊबहिणीचं...!!

भाऊ-बहिणी म्हणजे केवळ नातं नसतं. ते आपल्या आई-वडिलांनी आपल्यासाठी जपून ठेवलेली सर्वात मौल्यवान ठेव आहे. याची आपल्याला फार उशिरा जाणीव होते. फक्त सख्खे भावंडं नाही तर चुलत, मावस, मामे, आत्ते सर्व भावंडांसाठी. आपण लहान असतांना भाऊ बहिणी सर्वात जवळचे सवंगडी होते. दररोज सर्वजन एकत्र खेळत होतो आणि गोंधळ घालत होतो आणि बालपणीचा काळ एकत्र घालवत होतो.

आयुष्यात पुढे जाऊन आपण एकमेकांपासून दूर जाऊ अशी पुसटशी सुद्धा कल्पना मनाला कधी शिवली नाही. मोठे होत गेलो तसं आयुष्याला पंख फुटले. स्वतःचे वेगळे जीवन सुरू झाले. सगळे आपापल्या संसारात रमले आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेले. दिवस, महिने, वर्षं सरकत गेली आणि कधी नकळतच भाऊ बहिणींच्या भेटी कधीतरी या शब्दात अडकून राहिल्या. आज आपण क्वचितच भेटतो, पण मनातल्या आठवणी मात्र अजूनही रोजच भेटायला येतात.

आई-वडील हा एकमेव दुवा होता ज्याने आपल्या सर्वांना जोडले. ज्यांच्या प्रेमाच्या एका धाग्याने सगळ्या भावंडांना एकत्र बांधून ठेवलं होतं. नंतर मात्र आपण वेळेची वाटच पाहत राहतो, हळूहळू म्हातारे होईपर्यंत. तेव्हाच लक्षात येतं की आई वडील आपल्याला सोडून गेले आहेत, आणि आजूबाजूची नाती एकेक करत कमी होत चालली आहेत आणि नेमकं तेव्हाच आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला हळूहळू मायेची किंमत कळायला लागते,

नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये १०१ वर्षांचा मोठा भाऊ त्याच्या ९६ वर्षांच्या धाकट्या बहिणीला भेटायला गेला होता. दोघांमध्ये शब्द कमी पण भावना अनावर झाल्या होत्या. थोड्या वेळानंतर जेव्हा दोघे वेगळे होणार होते, तेव्हा धाकट्या बहिणीने कारचा पाठलाग केला आणि तिच्या भावाला २०० युआन दिले आणि त्याला काहीतरी छान खाण्यास सांगितले. तिचे बोलणे पूर्ण होण्याआधीच दोघांनाही अश्रू अनावर झाले. ते दृश्य बघताना शेवटी असं वाटतं, जणू ते भाऊ बहिण मनोमन एकमेकांना हेच आश्वासन देत असावेत की कदाचित ह्या जन्मात पुन्हा भेट नाहीच झाली तर पुढच्या जन्मात मात्र आपण नक्कीच एकमेकांना भेटू. असे काही नेटिझन्स होते ज्यांनी टिप्पणी केली की एवढ्या मोठ्या वयात भाऊ आणि बहिणी भेटणे खरोखरच खूप भाग्याचे लक्षण आहे,

होय, आपण म्हातारे झाल्यावरच आपल्याला कळते की या जगात आपल्याशी कोणीतरी रक्ताने बांधलेला असणे किती महत्त्वाचे आहे. तेव्हा संपत्ती, मान सन्मान, यश सगळं मागे पडतं. जेव्हा तुम्ही म्हातारे असाल आणि तुमचे आई-वडील दोघेही या जगातून निघून गेलेले असतील, तेव्हा या विशाल, गर्दीच्या जगात तुमचे भाऊ बहिणीच सर्वात जवळचे लोक असतात.

मित्र काळाच्या ओघात दूर जाऊ शकतात. मुलं मोठी होतात, ती ही आपापल्या विश्वात रमून दूर निघून जातात. पण आयुष्याच्या संध्याकाळी, जेव्हा हाताला हात हवा असतो, तेव्हा खर्‍या अर्थाने साथ देत उरतात ते फक्त दोनच आधारस्तंभ. तुमचा जीवनसाथी आणि तुमचे बहिण भाऊ.

आपण कितीही म्हातारे झालो तरी सर्व भाऊ-बहिणी एकत्र जमू शकणे हा एक मोठा आनंद आहे. त्यांच्या सहवासात वयाचं ओझंही हलकं होतं, आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनाला उबदारपणाची कधीच कमतरता भासणार नाही. त्यांच्या सहवासात आम्ही कोणत्याही अडचणींना घाबरणार नाही.

म्हणूनच, वृद्धापकाळ येण्याआधीच कृपया, आपल्या भाऊ आणि बहिणींशी जुळवून घ्या, नाती जपा. कारण ही रक्ताची नातीच शेवटपर्यंत साथ देतात. भूतकाळात काहीही अप्रिय घडलं असलं तरीही भाऊ बहिणींनी एकमेकांशी अधिक सहनशील, अधिक समजूतदार आणि अधिक क्षमाशील असले पाहिजे. अशी कोणतीही गाठ नाही, जी भाऊ बहिणीच्या नात्यात बांधता येत नाही. अशी कोणतीही ढाल नाही जी भाऊ बहिणीच्या नात्यातून काढली जाऊ शकत नाही.

भाऊ बहिणींनी कधीही जुने हिशेब मांडू नयेत, कधीही जुनी नाराजी मनात बाळगू नये. थोडे अधिक परस्पर अवलंबित्व, थोडं अधिक परस्पर पालनपोषणाने भाऊ बहिणीचे संबंध दिवसेंदिवस अधिक चांगले आणि अधिक घट्ट होतील. कारण या जगात, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी ठेवलेली ही सर्व नातीच सर्वात "मौल्यवान ठेवी" आहेत.

  प्रा. दिलीप आनंदराव जाधव सांगली 

                 सचिव

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,सांगली 

   ‌         राज्य कोषाध्यक्ष

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य



Post a Comment

0 Comments