Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप परिसरात एक तरुण व एक तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; मंद्रूप पोलिसात अकस्मात मयताची नोंद...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळेदक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर व मंद्रूप येथे गुरुवारी (दि. 5 मार्च ) आणि शुक्रवारी (दि. 6 मार्च) रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक तरुण व एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पहिली घटना बसवनगर येथे घडली. पल्लवी किसन पवार (वय 19, रा. बसवनगर ता. दक्षिण सोलापूर) हिने अज्ञात कारणावरून राहत्या घरातील लोखंडी पाईपला काळ्या रंगाच्या साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवीचे वडील किसन लालसिंग पवार हे रिक्षा चालक असून शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते रिक्षा घेऊन बसवनगर येथील रिक्षा स्टॉपवर गेले होते. काही वेळानंतर मुलगा संदेश व कुणाल यांनी त्यांना हाक मारून घरी बोलावले. घरासमोर गर्दी झाल्याचे पाहून त्यांनी चौकशी केली असता पल्लवीने घराच्या मागील खोलीत गळफास घेतल्याचे समजले. दरवाजा आतून बंद असल्याने संदेश पवार व रमेश शंकर नाईक यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पल्लवी ही लोखंडी पाईपला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मंद्रूप येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून ती उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले.

दुसरी घटना मंद्रूप येथील सकलेश्वर गल्ली परिसरात घडली. अभिजीत सिद्रामप्पा मेंडगुदले (वय 25, रा. सकलेश्वर गल्ली, मंद्रूप ता. दक्षिण सोलापूर) या तरुणाने घराच्या गच्चीवरील खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत याचा मंद्रूप येथे मोटारसायकल शोरूमचा व्यवसाय होता. गुरुवारी रात्री कुटुंबीयांनी जेवण करून झोप घेतली. पहाटे सुमारे पाच वाजता त्याचा भाऊ सुमित मेंडगुदले जागा झाल्यावर अभिजीत खोलीत नसल्याचे लक्षात आले. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने वडिलांना बोलावून दरवाजा उघडण्यात आला. शेजारच्या खोलीत पाहिले असता अभिजीत हा पंख्याला पिवळ्या रंगाच्या नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मंद्रूप येथे नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तो उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

या दोन्ही घटनांबाबत संबंधित कुटुंबीयांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. या दोन्ही प्रकरणांची नोंद मंद्रूप पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पल्लवी पवार प्रकरणाचा तपास पो.ह.फौ. शिंदे तर अभिजीत मेंडगुदले प्रकरणाचा तपास पो.ना. मसलखांब करत आहेत.

मंद्रूप परिसरात एक तरुण व एका तरुणीने आत्महत्या केल्याने मंद्रूप परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



Post a Comment

0 Comments