Advertisement

Breaking News
Loading...

आंतरजिल्हा मोटारसायकल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद; ८.८० लाखांच्या १५ मोटारसायकली जप्त... सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; विविध जिल्ह्यांतील चोरी उघड...

 


सोलापूर ग्रामीण|हॅलो रिपोर्टर न्यूज|मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद केले आहे. आरोपीकडून एकूण ८ लाख ८० हजार रुपये किमतीच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.


जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.

दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकातील कर्मचारी पंढरपूर उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, मोहोळ पोलीस ठाणे गुन्हा क्र. ७३/२०२६ (बीएनएस कलम ३०३(२)) मधील चोरीस गेलेली मोटारसायकल विक्रीसाठी शिवाजी चौक, पंढरपूर येथे एक सराईत आरोपी येणार आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नामदेव बबन चुनाडे (रा. कराडकर मठा शेजारी, पंढरपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने विविध जिल्ह्यांतून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.

आरोपीने मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतून १, सांगोला पोलीस ठाणे हद्दीतून २, कर्जत (जि. अहिल्यानगर) येथून १, सांगली जिल्ह्यातून ३, धाराशीव जिल्ह्यातून १, फुरसंगी, पुणे शहर मधून १, पुणे ग्रामीणमधून ३, नाशिक ग्रामीणमधून १ आणि इतर ठिकाणांहून २ अशा एकूण १५ मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले.

ही सर्व मोटारसायकली आरोपीने कोर्टी चौक, सांगोला बायपास रोड, पंढरपूर येथील चिल्लारी परिसरातील पडक्या जागेत लपवून ठेवलेल्या असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या ठिकाणावरून सर्व मोटारसायकली जप्त केल्या. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि. विजय शिंदे करत आहेत.

तपासात आरोपीवर विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे १०० मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

जप्त मोटारसायकलींची पडताळणी केल्यानंतर खालील पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे :

मोहोळ (सोलापूर ग्रामीण) – १, सांगोला (सोलापूर ग्रामीण) – २, कर्जत (अहिल्यानगर) – १, कवठेमहांकाळ (सांगली) – १, आटपाडी (सांगली) – २, सासवड (पुणे ग्रामीण) – १, फुरसुंगी (पुणे शहर) – १, भुम (धाराशीव) – १, बारामती (पुणे ग्रामीण) – २, नाशिक ग्रामीण – १, इतर – २, असा एकूण १५ मोटारसायकलींचा समावेश आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ रवि माने, सलीम बागवान, मपोहेकॉ आश्विनी गोटे, पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपडे, सुरज रामगुडे, मनोज राठोड, अनवर, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा झळके आणि चालक पोलीस नाईक समीर शेख यांनी सहभाग घेतला.



Post a Comment

0 Comments