सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंदे व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून पंढरपूर शहर परिसरात अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या सराईत आरोपीवर महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करून त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.
मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. सराईत आरोपी सुरज उर्फ अंबान्या दत्तात्रय पवार (रा. फुट रस्ता, कोर्टी ता. पंढरपूर) हा पंढरपूर शहर व परिसरात अवैधरित्या वाळू तस्करी करून त्यातून आर्थिक फायदा मिळवत होता. तसेच या बेकायदेशीर धंद्यातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांवर हल्ले करणे, धमक्या देणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणारे विविध गुन्हे करीत होता. आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत प्रस्ताव पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे) यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांचेकडे पाठविला होता. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिस शेख यांनी प्रस्ताव तयार करून मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आला होता.
सदर प्रस्तावानुसार मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी आरोपीस एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. वाघमोडे तसेच पंढरपूर शहर डीबी पथकातील अंमलदारांनी आरोपीस ताब्यात घेऊन त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे रवानगी केली.
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंदे, वाळू तस्करी तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से.), पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण) व पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


0 Comments