बरूर (ता. द. सोलापूर) | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | जिद्द, तयारी आणि निसर्गप्रेम यांच्या जोरावर बरूर येथील शिक्षक अरविंद भंडे यांनी हिमालयातील पिरपंजाल पर्वतरांगेतील तब्बल 12,256 फूट उंचीवरील ‘चंद्रखणी शिखर’ यशस्वीरित्या सर करून एक उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
कडाक्याची थंडी, वेगवान वारे आणि कमी ऑक्सिजन अशा कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. तब्बल 9 दिवसांच्या या आव्हानात्मक ट्रेकमध्ये त्यांनी शारीरिक व मानसिक तयारीच्या जोरावर यश संपादन केले.
या शिखरावरून हनुमान तिब्बा, देवतिब्बा, फ्रेंडशिप पीक, मुनिर्भे यांसारख्या बर्फाच्छादित शिखरांचे नेत्रदीपक दर्शन घडते, ज्यामुळे ही मोहीम अधिकच अविस्मरणीय ठरली.
या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा गिर्यारोहण असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, तसेच सुनील पाटील, ज्ञानेश्वर गुंड, कृष्णा जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करून गौरव केला आहे.
आपला अनुभव सांगताना भंडे म्हणाले, “हिमालयातील निसर्गाची अप्रतिम सुंदरता, खळाळणारे झरे, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट अनुभवताना स्वतःला नव्याने शोधण्याची संधी मिळाली. जंगलातून आणि बर्फाच्छादित डोंगरांवर चालण्याचा आनंद अविस्मरणीय आहे.”
अरविंद भंडे यांच्या या यशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!



0 Comments