टाकळी |हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
नीट पेपरफुटी प्रकरण, संशोधक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच दिल्लीतील आंदोलकांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ टाकळी येथे ग्रामस्थ, महिला व कार्यकर्त्यांनी तिरडी आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
टाकळी येथील शिवाजी चौकात झालेल्या आंदोलनात तिरडी यात्रा काढण्यात आली. आंदोलकांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत विविध मागण्या मांडल्या. आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रतिमा लावलेल्या तिरडीचे प्रतिकात्मक दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.
संघर्ष सेनेचे शेखर बंगाळे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आंदोलकांवरील कारवाईची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत नीट पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी, जबाबदारी निश्चित करणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. तसेच विविध राष्ट्रीय घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले.
आंदोलनात सहभागी नागरिकांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. आंदोलनावेळी टाकळी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments