रविवारचा चहा क्रमांक- २१४
शेवटच्या दर्शनाचा सोहळा
माणूस जगत असताना एकटा असतो. पडला तर विचारणारे कमी, आजारी पडला तर चौकशीला येणारे मोजके. पण त्याच माणसाला जेव्हा मृत्यू गवसतो, तेव्हा अचानक गर्दी होते. अंगण भरतं, घरातल्या भिंतींना माणसांचे आवाज लागतात, शेजारी, नातेवाईक, गावकरी, ओळखीचे, अनोळखी सगळे येतात. कोण फुलं घेऊन, कोण हार घेऊन, कोण फक्त "शेवटचं तोंड बघायला" म्हणून.
सुख-दु:खाच्या नात्याने बांधलेली हीच माणसं मरणानंतर अधिक जुळलेली दिसतात. जिवंतपणी तुटले धागे मयताच्या पिंपळाखाली पुन्हा जोडले जातात. पण प्रश्न उरतोच, हा संगम खरा आहे का?
एका माणसाला आयुष्यात चार गोष्टींची सर्वात जास्त गरज असते. प्रेम, आधार, आपुलकी आणि वेळ. ताप आला की डोक्यावर हात ठेवणारा, पगार वेळेवर नाही आला की "काळजी करू नको" म्हणणारा, एकटं वाटतंय म्हणून अर्धा तास गप्पा मारायला बसणारा.
पण आपण बघतो काय?
लग्नात पत्रिका जरी पोहोचली तरी "काम होतं" म्हणून न येणारा मामा, आजारपणात एकदाही फोन न करणारी मावशी, घरात भांडण झालं तेव्हा पाठ फिरवणारे शेजारी. संकटात सगळे व्यस्त असतात. वाढदिवसाला शुभेच्छा देण्यालाही वेळ नसतो.
माणूस हळूहळू समजून घेतो की जग स्वार्थाचं आहे. आणि तोही स्वतःमध्ये गुरफटतो.
आणि मग एक दिवस निरोप येतो. "अमुक गेले."
बस, त्यानंतर काय जादू होते!
"गाडी मिळाली नाही तरी चालेल, प्रायव्हेटने येऊ."
"ऑफिसमध्ये रजा टाकतो, पण जायला हवंच."
"शेवटचं दर्शन नाही घेतलं तर आयुष्यभर अपराधी वाटेल."
लांब असणारे जवळ येतात. न बोलणारे गळा भरून येऊन बोलतात. वर्षातून एकदा भेटणारे आता छातीशी कवटाळतात.
का? कारण आता भीती असते. "लोकं काय म्हणतील" याची भीती. "आपण आलो नाही तर नावं ठेवतील" याची भीती. आणि सर्वात मोठी भीती म्हणजे, आपणही एक दिवस असेच जाणार आहोत, याची जाणीव.
मृत्यू हा आरसा आहे. त्यात आपल्याला आपलंच प्रतिबिंब दिसतं. म्हणून आपण रडतो. त्या मेल्या माणसासाठी नाही, तर आपल्यासाठी.
स्मशानातले दृश्य तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनी पाहिलं असेल.
एका कोपऱ्यात बाई पदर तोंडाला लावून हुंदके देतेय. दुसरीकडे मित्र मोठ्याने ओरडतोय, "अरे, असा का गेलास यार?" तिसरीकडे कोणीतरी व्हिडिओ काढतोय. चौथ्याकडे चर्चा सुरू आहे, "मुलगा अमेरिकेहून वेळेवर आला का?" "सून एकदाही रडली नाही हो." "अमुक काका तर दोन दिवसांनी आले."
मयताच्या टोपलीत किती फुलं पडली, कोण किती वेळ बसलं, कोणाच्या डोळ्यात खरं पाणी होतं, यावरून त्या घराच्या नात्यांचा हिशोब केला जातो. जणू माणुसकीचा मार्कशीट इथेच भरला जातो.
पण ज्या दिवशी त्या माणसाला अर्धांगवायू झाला होता, त्या दिवशी हेच लोक कुठे होते? जेव्हा त्याच्या बायकोने एकटीने हॉस्पिटलचे हप्ते भरले, तेव्हा हात पुढे करणारे कुठे होते? जेव्हा त्याचा मुलगा नोकरीसाठी भटकत होता, तेव्हा "माझी ओळख आहे" म्हणणारे कुठे होते?
उत्तर माहीत आहे. ते "व्यस्त" होते.
मृत्यू नंतरची सहानुभूती हा एक सोहळा आहे. त्यात खर्च कमी आणि प्रसिद्धी जास्त.
जिवंत माणसाला मदत करायची म्हणजे वेळ द्यावा लागतो, पैसा द्यावा लागतो, जबाबदारी घ्यावी लागते. पण मेल्या माणसाला हार आणि दोन अश्रू दिले की काम झालं. फोटो काढला, स्टेटसला लावला, "भावपूर्ण श्रद्धांजली" लिहिलं. चार लोकं "खूप चांगला माणूस होता" म्हणतील. आपली प्रतिमा स्वच्छ राहील.
म्हणूनच स्वयंपाकाला मदत करायला बायका हमखास येतात. तेराव्याला पंचपक्वान्न होतं. पण त्या माणसाने जेव्हा एकट्याने भाकरी खाल्ली होती, तेव्हा कोणी विचारलं नव्हतं, "जेवला का?"
ही सहानुभूती नाही. ही सोपस्कार आहे. समाजाने ठरवून दिलेली रीत आहे. ती न पाळली तर "निर्दयी" ठरवले जाण्याची भीती आहे.
माणुसकीची परीक्षा मृत्यू नंतर नाही, जिवंतपणी असते.
खरा कस तेव्हा लागतो जेव्हा मित्राचा धंदा बुडतो आणि बँकेचे लोक दार ठोठावतात.
खरा कस तेव्हा लागतो जेव्हा शेजारच्या काकांना रात्री दोन वाजता दवाखान्यात न्यावं लागतं.
खरा कस तेव्हा लागतो जेव्हा कुणाचा वाढदिवस आहे हे लक्षात ठेवून फोन करावा लागतो.
खरा कस तेव्हा लागतो जेव्हा कुणी अपयशी झालं तरी त्याच्या पाठीवर हात ठेवावा लागतो.
मृत्यू नंतरचे अश्रू सहज आहेत. कारण जाणारी व्यक्ती परत मागणार नाही. परत मदत मागणार नाही. परत वेळ मागणार नाही. म्हणून देणं सोपं होतं.
पण जिवंत माणूस मागतो. तो वेडा प्रश्न विचारतो, "आज माझ्यासाठी वेळ आहे का?" आणि तिथेच आपण गडबडतो.
भारतात, आणि विशेषतः महाराष्ट्रात, मयत ही एक सार्वजनिक घटना आहे.
स्मशानाजवळचा कट्टा, चहाचं टपरी, व्हॉट्सअप ग्रुप सगळीकडे एकच चर्चा. "त्याला कॅन्सर होता म्हणे." "पोरांनी नीट लक्ष दिलं नाही." "बाईने दुसरा विचार केला असेल."
मृत्यू नंतर माणसाचं संपूर्ण आयुष्य पाच मिनिटांच्या चर्चेत मोजलं जातं. त्याचे चांगले कर्म विसरले जातात, आणि एक दोन चुका शंभर वेळा सांगितल्या जातात.
ही क्रूरता नाही का? जिवंत असताना आपण त्याच्याशी गोड बोललो नाही, पण मेल्यावर त्याच्या चारित्र्याचा पंचनामा करतो.
हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.
मृत माणसाला काहीच मिळत नाही. त्याला आता फुलांचा सुगंध येत नाही, हाराचा भार जाणवत नाही, "आम्ही आलो" हे ऐकू येत नाही.
मग कोणासाठी आहे हा सगळा आटापिटा?
तो आपल्यासाठी आहे. आपला अपराध कमी करण्यासाठी. "आपण कर्तव्य पार पाडलं" हे स्वतःला सांगण्यासाठी.
पण खरं कर्तव्य तर त्याच्या श्वासात होतं. त्या श्वासात आपण अपयशी ठरलो.
खरी सहानुभूती मृत्यूनंतर नाही, जगत असताना द्या.
वेळ काढा.
फोन करा. नुसता "कसा आहेस" म्हणून विचारा.
आजारात एकदा तरी दवाखान्यात डोकावा.
संकटात "मी आहे" एवढंच म्हणा.
अपयशात टोमणे न मारता साथ द्या.
आनंदात हजर रहा, म्हणजे दुःखातही तुमचं हसणं आठवेल.
एका जिवंत माणसाच्या डोळ्यात आनंद बघणं, हे मयताच्या चेहऱ्यावर फुलं वाहण्यापेक्षा कितीतरी मोठं पुण्य आहे.
कबीर म्हणतात, "जिवंत पितराला पाणी द्या, मेल्यावर गंगेत बुडवून काय उपयोग?"
हेच सत्य आहे.
आपण सगळे एका दिवसाची वाट बघतोय. त्या दिवशी आपल्यासाठीही लोकं येतील. रडतील. भाषणं देतील. पण आपल्याला काय फायदा?
म्हणून आजपासून ठरवूया. राग, अहंकार, "नंतर बोलू" हे बाजूला ठेवूया.
ज्याच्याशी बोलणं बंद आहे त्याला फोन करू.
ज्याला आपली गरज आहे त्याच्या घरी जाऊ.
जो एकटा आहे त्याच्यासोबत चहा पिऊ.
कारण माणूस मेल्यावर मिळणाऱ्या गर्दीला काही अर्थ नाही. जिवंतपणी मिळणाऱ्या एका माणसाच्या साथीला मात्र अर्थ आहे.
शेवटचं तोंड बघण्याच्या दिखाव्यापेक्षा, जिवंत असलेल्या माणसाच्या डोळ्यातील चमक बघण्यासाठी वेळ काढा.
त्याच्या हसण्याचा साक्षी व्हा.
त्याच्या दुःखात ढाल व्हा.
तो असताना प्रेम द्या.
जेणेकरून तो गेल्यावर आपल्याला फुकटच्या ढोंगी सहानुभूतीचा आभाळ पेलावा लागणार नाही.
आणि त्यालाही, "मी एकटा नव्हतो" ही शेवटची खात्री घेऊन जाता येईल.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव,सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ,महाराष्ट्र राज्य.
सचिव
सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सांगली


0 Comments