लांबोटी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | लांबोटी ते शिरापूर या सुमारे तीन किलोमीटरच्या रस्त्यावर साईटपट्टीला साचलेली माती, चिल्लारी व झुडपे यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत होते. परिणामी शाळकरी विद्यार्थी, दुचाकीस्वार, सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. चारचाकी वाहने वेगाने गेल्यानंतर रस्त्यावर साचलेले पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याने संताप व्यक्त केला जात होता.
या समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्यावरील साईटपट्टीतील माती व चिल्लारी काढण्याचे काम आजपासून सुरू केले आहे.
या कामासाठी सुमारे ₹१५ ते ₹२० हजारांचा खर्च अपेक्षित असून, नागरिकांच्या हितासाठी हा खर्च स्वतः उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. "आंदोलन करून वेळ घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून नागरिकांना दिलासा देणे अधिक महत्त्वाचे आहे. मला राजकारण करायचे नाही, तर जनतेच्या हिताची कामे करायची आहेत," अशी भावना अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
या उपक्रमामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचणार नाही, तसेच विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना सुरक्षित व सुलभ प्रवास करता येईल, अशी अपेक्षा पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली असून अनिल पाटील यांच्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



0 Comments