Advertisement

Breaking News
Loading...

लोकाभिमुख प्रशासनाची दखल; तहसीलदार राजशेखर लिंबारे यांचा ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड’ने गौरव...

 


सांगली | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | प्रशासकीय कामकाजात तत्परता, पारदर्शकता आणि जनसेवेची बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या उल्लेखनीय कार्याची ‘लोकमत’ने दखल घेतली आहे. त्यांच्या लोकाभिमुख प्रशासकीय कार्याबद्दल ‘लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स – सांगली’ या पुरस्काराने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

तहसीलदार लिंबारे यांनी महसूल प्रशासनासह शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविताना नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांचे रस्ते, जमीन नोंदी, जमीन वाटप, जन्म-मृत्यू नोंदणी, महसूल वसुली, शेतीतील अतिक्रमण, आपत्ती व्यवस्थापन तसेच पीक व शेती नुकसानभरपाई यांसारख्या विविध प्रश्नांवर त्यांनी तत्परतेने कार्यवाही केली आहे.

‘नागरिकांना थेट तहसीलदारांशी संवाद साधता यावा’ यासाठी तहसील कार्यालयाचे दरवाजे त्यांनी सदैव खुले ठेवले. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद व समन्वय वाढवून सामान्य माणसाला शासकीय यंत्रणेचा सकारात्मक अनुभव मिळावा, याला त्यांनी विशेष महत्त्व दिले.

दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि मंद्रूप तहसील कार्यालयातही त्यांनी उल्लेखनीय प्रशासकीय कामकाज केले आहे. सध्या सांगली जिल्ह्यातील आष्टा अपर तहसील कार्यालयात कार्यरत असताना त्यांनी लोकाभिमुख प्रशासनाची परंपरा कायम ठेवली. त्यांच्या कार्याची दखल घेत ‘लोकमत’ने केलेला हा सन्मान त्यांच्या प्रशासकीय कार्याचा गौरव मानला जात आहे.

कर्तव्यनिष्ठा, पारदर्शकता आणि जनसेवेच्या माध्यमातून प्रशासनाला मानवी चेहरा देणाऱ्या तहसीलदार लिंबारे यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.



Post a Comment

0 Comments