रविवारचा चहा क्रमांक- २१९
"स्वतःची साथच शेवटी खरी"
काळ हा केवळ घड्याळाच्या काट्यांवर मोजला जाणारा काळ नसतो. तो आपल्या जखमा, आपले हसणे, आपले तुटणे आणि पुन्हा जोडणे यांच्यावरून मोजला जातो. आणि काळ जेव्हा शिकवायला लागतो, तेव्हा तो पाठ्यपुस्तकातून शिकवत नाही. तो माणसांमधून शिकवतो, नात्यांमधून शिकवतो, अपेक्षांच्या भंगातून शिकवतो.
लहानपणी आपल्याला वाटतं, जग सरळ आहे. जो हसतो तो आपला आहे, जो जवळ येतो तो आपला आहे. पण जसजसे वय वाढत जाते, तसतसे कळायला लागते की प्रत्येक चेहऱ्यामागे एक अदृश्य गणित चालू असतं.
"प्रत्येक चेहऱ्यामागे एक हिसाब दडलेला असतो."कुणी आपल्याशी गोड बोलतो कारण त्याला आपली गरज असते. कुणी आपल्याला जवळ करतो कारण त्याच्या एकटेपणाला आपला खांदा हवा असतो. कुणी आपल्याला मोठं करतो कारण आपल्या यशात त्याला आपलं प्रतिबिंब दिसतं. यात वाईट काही नाही. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. व्यवहाराशिवाय जग चालत नाही. पण जेव्हा हा हिसाब फक्त एकतर्फी होतो, तेव्हा मनाला ठेच लागते.
आपण समोरच्यासाठी मनापासून धावतो, रात्र जागवतो, वेळ देतो. आणि ज्या दिवशी आपल्याला गरज असते, त्या दिवशी तोच माणूस "मी बिझी आहे" म्हणून बाजूला होतो. तेव्हा कळतं, ओठांवरची प्रेमाची भाषा आणि मनातला स्वार्थाचा अर्थ यात किती अंतर असतं."ओठांवर प्रेमाची भाषा असते, पण मनात स्वार्थ"हा विरोधाभासच माणसाचं खरं रूप आहे का? कदाचित नाही. कदाचित माणूसही परिस्थितीचा गुलाम असतो. पण तरीही, ज्यावेळी आपण निस्वार्थपणे प्रेम करतो, त्यावेळी समोरून व्यवहाराची पावती मिळाली की आत कुठेतरी एक भिंत उभी राहते. आणि ती भिंत म्हणजेच अनुभव.
नाती ही हवेसारखी असतात. जोपर्यंत ती आहेत, तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. गुदमरायला लागल्यावरच ऑक्सिजनची किंमत कळते, तसेच नात्यांचं आहे.
"जोपर्यंत तुम्ही त्यांच्या मनासारखे जगता, तोपर्यंत तुम्ही त्यांचे 'आपले' असता."म्हणजे एका मोठ्या सत्याचं झाकण आहे. घरात, ऑफिसमध्ये, मैत्रीत, अगदी प्रेमातही ही अट असतेच. तू आमच्यासारखा विचार कर, आमच्यासारखं बोल, आमच्यासारखी जीवनशैली जग... मग तू आमचा.
पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी जगायला लागता, स्वतःचे मत मांडायला लागता, त्या दिवशी 'आपले' हे लेबल निघून जातं. मग सुरू होतात टोमणे, उपदेश, आणि शेवटी दुरावा.
पूर्वी याचं दुःख व्हायचं. का लोक बदलतात? का प्रेमाला अटी घालतात? पण आता कळतं, लोक बदलत नाहीत. लोक फक्त मूळ रूपात परत येतात. आपण त्यांना देवदूत समजून घेतलं होतं, म्हणून आपल्याला धक्का बसला.
नात्यांची किंमत शब्दांनी ठरत नाही. "तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस", "तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस" हे हजार वेळा बोलूनही नातं टिकत नाही. नातं टिकतं कसोटीच्या वेळी. "नात्यांची किंमत शब्दांनी नसते, ती वेळ आल्यावर कळते."
आजारपणात कोण डोक्यावर हात ठेवतो, अपयशात कोण खांद्यावर हात ठेवतो, आणि यशात कोण डोळ्यात जल न आणता आनंदित होतो,हेच खरे नाते. बाकी सर्व सणासुदीच्या शुभेच्छा आहेत.
आयुष्यात काही लोक वादळासारखे येतात. मोठा गाजावाजा करतात, वचनांचा पाऊस पाडतात, आणि गेल्यावर फक्त ओलसर आठवणी ठेवून जातात. आणि काही लोक पावसाळ्यातल्या झाडासारखे असतात. शांतपणे सावली देतात, फळ देतात, आणि आपण आहोत याची जाणीवही करून देत नाहीत.
"जे खरे असतात, ते साथ कधीच सोडत नाहीत, आणि जे खोटे असतात, ते कारणं शोधत निघून जातात."खोट्या माणसाला जाण्यासाठी कारण लागतं. "तू बदललास", "तुझ्यामुळे माझं नुकसान झालं", "आता आपले विचार जुळत नाहीत". ही कारणं तयार असतातच. कारण जाण्याचा निर्णय आधीच झालेला असतो.
आणि खऱ्या माणसाला थांबण्यासाठी कारण लागत नाही. तुमच्यात हजार दोष असले तरी तो म्हणतो "चल, सोडवू". कारण त्याच्यासाठी नातं हे प्रोजेक्ट नाही, ते श्वास आहे.
पूर्वी आपण खोट्यांना अडवायचो. स्पष्टीकरण द्यायचो, विनवण्या करायचो. आता नाही. कारण कळलं आहे, जो जायचा तो जाणारच. आणि जो राहायचा तो कोणत्याही वादळात राहणारच.
आयुष्याच्या एका टप्प्यावर माणूस थकतो. धावून, सांगून, सिद्ध करून थकतो. आणि मग त्याला एक शांतता गवसते.
"म्हणून आता अपेक्षा नाहीत कुणाकडून, नाही कुणाला दोष देण्याची गरज."ही उदासीनता नाही. ही वैराग्याची परिपक्वता आहे. अपेक्षा ठेवणे म्हणजे आपल्या आनंदाची चावी दुसऱ्याच्या हात देण्यासारखे आहे. आणि दोष देणे म्हणजे आपल्या आयुष्याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्यासारखे आहे.
जेव्हा आपण अपेक्षा करतो, तेव्हा आपण दुसऱ्याला आपल्या मनासारखे वागण्यास भाग पाडतो. आणि जेव्हा ते तसे वागत नाहीत, तेव्हा आपण दुखावतो. मग राग येतो, मग नातं बिघडतं.
पण ज्या दिवशी आपण म्हणतो "ठीक आहे, तू जसा आहेस तसा रहा. मी माझ्या परीने आनंदी राहीन", त्या दिवशी अर्धे दुःख संपते.
दोष देणे सोपे असते. "त्याच्यामुळे माझे असे झाले". पण ही सवय आपल्याला कमकुवत करते. आपल्याला पीडित बनवते. त्याऐवजी जेव्हा आपण जबाबदारी घेतो, तेव्हा आपण सशक्त होतो.
शेवटी सर्व प्रवास एकट्यानेच करावे लागतात. आईच्या गर्भापासून स्मशानापर्यंतचा प्रवास आपण एकटेच करतो. मधल्या काळात सोबती येतात, जातात. काही काळासाठी आपले आयुष्य उजळवून जातात. काही काळासाठी अंधार करून जातात. पण प्रवास मात्र आपलाच असतो.
"कारण शेवटी प्रत्येक प्रवासात,
स्वतःची साथच शेवटी खरी ठरते."
हे ऐकायला स्वार्थी वाटते. पण ती सर्वात मोठे सत्य आहे.
तुम्हाला रात्री झोप येत नाही तेव्हा कोण जागा राहतो? तुम्हीच.
तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा अंतिम सही कोणाची असते? तुमचीच. तुम्हाला आयुष्याशी लढायचे असते तेव्हा मैदानात कोण उतरते? तुम्हीच.
लोक येतील, हात देतील, प्रोत्साहन देतील. पण पाऊल तुम्हालाच टाकावे लागेल. लोक कौतुक करतील, टीका करतील. पण त्याचा परिणाम तुमच्यावरच होईल.
म्हणूनच स्वतःशी मैत्री करणे हे सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे. स्वतःवर प्रेम करणे, स्वतःला माफ करणे, स्वतःला समजून घेणे. जो माणूस स्वतःचा मित्र बनतो, त्याला जगात कधीच एकटे वाटत नाही.
काळ क्रूर आहे का? कदाचित. तो हिरावून घेतो. पण तो देतोही. तो भ्रम हिरावून घेतो आणि सत्य देतो. तो माणसे हिरावून घेतो आणि अनुभव देतो. तो स्वप्ने हिरावून घेतो आणि वास्तव देतो.आज मागे वळून पाहिलं की लक्षात येतं, ज्यांनी दुखावलं त्यांनीही काहीतरी शिकवलं. ज्यांनी सोडलं त्यांनीही स्वावलंबन शिकवलं. ज्यांनी फसवले त्यांनीही पारखी नजरेने बघायला शिकवलं.
म्हणून आता तक्रार नाही. राग नाही. फक्त एक हळुवार स्वीकृती आहे.
जग जसे आहे तसे स्वीकारणे. माणसे जशी आहेत तशी स्वीकारणे. आणि स्वतःला जसे आहे तसे स्वीकारणे.
काळाने शिकवलेली हीच सर्वात मोठी ललितकला आहे . जगण्याची कला. जिथे आपण कोणाकडून काही अपेक्षा न करता प्रेम करू शकतो. जिथे आपण दुखावलो तरी तुटत नाही. जिथे आपल्याला कळतं की आपणच आपला शेवटचा आश्रय आहोत. आणि ही जाणीव झाली की आयुष्य हलके होते. कारण आता आपण इतरांच्या वागण्यावर आपला आनंद अवलंबून ठेवत नाही. आपण आपल्या आनंदाचे मालक बनतो.
म्हणून शेवटी एवढेच
चला, स्वतःशी हात मिळवू.
स्वतःला सांगू, "मी आहे तुझ्यासाठी".
कारण शेवटी, प्रत्येक प्रवासात,
स्वतःची साथच शेवटी खरी ठरते.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव सांगली
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.
सचिव
सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.



0 Comments