Advertisement

Breaking News
Loading...

‘मीडिया मास्टर’ नव्या पत्रकारांना दिशा देणारे पुस्तक ठरेल : अण्णासाहेब भालशंकर जागृती पब्लिकेशनतर्फे ‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचे प्रकाशन; सामाजिक न्यायासाठी निर्भीड पत्रकारितेची गरज व्यक्त...

 

सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |आजच्या डिजिटल युगात मीडिया हे समाजमन घडविणारे प्रभावी माध्यम असून, सत्य, तथ्य आणि सामाजिक जबाबदारी जपत निर्भीड पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ, सोलापूर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर यांनी केले.

जागृती पब्लिकेशन, सोलापूर यांच्या वतीने लेखक किरण बनसोडे यांच्या ‘मीडिया मास्टर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते मनोगत व्यक्त करत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर विनायक कोंडयाल, प्रा. डॉ. शिवाजीराव शिंदे, दिलीप पेठे, प्रशांत माने, विक्रम खेळबुडे, नगरसेवक मनीष केत यांच्यासह पत्रकार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

‘मीडिया मास्टर’च्या माध्यमातून पत्रकारितेची गुरुकिल्ली सर्वसामान्य आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न झाला असून, हे पुस्तक नव्या पत्रकारांना निश्चितच दिशा देईल, असे भालशंकर सर म्हणाले. समाजातील प्रश्न, अन्याय, शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या समस्या तसेच बहुजन समाजाच्या अपेक्षा शासन आणि समाजासमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी पत्रकारितेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना शिकविणारा घटक नसून समाजाला दिशा देणारा घटक आहे, असे सांगत शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील बदल आणि सामाजिक न्यायाचे मुद्दे प्रभावीपणे समाजासमोर मांडण्यासाठी स्वतंत्र व निर्भीड माध्यमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षण, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेण्यासाठी शिक्षक संघटना आणि माध्यमांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे, असेही भालशंकर सर यांनी सांगितले.

सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता बातमीसोबत सत्य, तथ्य आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक आहे. चुकीची माहिती समाजात गैरसमज निर्माण करू शकते; तर सत्य व जबाबदार पत्रकारिता समाजपरिवर्तनाची शक्ती ठरू शकते, असा संदेश त्यांनी दिला.

बहुजन शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी, संविधानिक मूल्यांसाठी आणि सामाजिक समतेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ‘मीडिया मास्टर'चे लेखक किरण बनसोडे आणि जागृती पब्लिकेशन यांचे अभिनंदन करत, हे पुस्तक पत्रकारितेची गुरुकिल्ली ठरावे, नव्या पत्रकारांना दिशा मिळावी आणि समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज अधिक बुलंद व्हावा, अशी अपेक्षा अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केली.


Post a Comment

0 Comments