मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ |शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
मंद्रूप येथील कादरी प्राथमिक व माध्यमिक प्रशालेच्या नवीन इमारतीच्या स्लॅब भरणीचा शुभारंभ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जागरूताज पाटील, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पाटील, सलमानताज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुशीलकुमार शिंदे यांनी गरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करून शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यातून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी देशातील भ्रष्टाचार व पेपरफुटीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अशा शैक्षणिक संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी शाळेसाठी जमीन उपलब्ध करून देणारे शिक्षक शिवानंद म्हैत्री यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. आमदार आसामनगरकर व शहाजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी विविध मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिले असून, भविष्यातही आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

















0 Comments