मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |मौजे आष्टे, ता. मोहोळ येथील ग्रामपंचायतीच्या विकासकामांमध्ये १५व्या वित्त आयोगाचा निधी कृती आराखड्यानुसार व लोकसंख्येच्या प्रमाणात खर्च न करता अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मोहोळ यांच्याकडे लेखी तक्रार करून संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, आष्टे येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यल्प झाले असतानाही सुमारे ४० लाख रुपयांची रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गावातील अंतर्गत गटारीचे काम, सार्वजनिक शौचालय, सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या साईड पट्ट्या तसेच पाणीपुरवठा विभागातील मोटारी, स्टार्टर व केबल याबाबतही लाखो रुपयांची बिले काढण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
जुन्या मोटारी दाखवून नवीन मोटारींची बिले काढल्याचा आरोप करत या सर्व कामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित कागदपत्रे, बिले व निधी खर्चाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
या प्रकरणी सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून गैरप्रकार केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशी करून कारवाई न झाल्यास २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती मोहोळ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अविनाश तुकाराम मेलगे व इतर ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, तक्रारीतील आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार असून, संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बाजूही महत्त्वाची राहणार आहे.


0 Comments