Advertisement

Breaking News
Loading...

नई जिंदगी परिसरातील ज्येष्ठ समाजसेवक बुरहान कोंडाजी मुल्ला यांचे निधन सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात होते सक्रिय; कुमठे येथे आज अंत्यविधी...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ : नई जिंदगी चौक, सोलापूर येथील रहिवासी तथा ज्येष्ठ समाजसेवक बुरहान कोंडाजी मुल्ला (वय ७३) यांचे रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने नई जिंदगी परिसरासह त्यांच्या मूळगाव कुमठे येथे शोककळा पसरली आहे.


बुरहान मुल्ला यांनी नई जिंदगी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजसेवेचे कार्य केले. तसेच ते झाकीर हुसेन ट्रस्टचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. नई जिंदगी परिसरातील रजा मुस्तफा मशिदीचे अध्यक्ष व सदर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

सामाजिक कार्यासोबतच ते राजकीय क्षेत्रातही सक्रिय होते. माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांचे समर्थक म्हणून ते परिचित होते. सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते.


त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई, भाऊ, नातवंडे तसेच मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे.

बुरहान कोंडाजी मुल्ला हे सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार फिरोज मियॉवाले, वळसंग पोलीस ठाण्याचे नबीलाल मियॉवाले आणि मंद्रुप पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अशफाक मियॉवाले यांचे मामा होत.

त्यांची अंत्ययात्रा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नई जिंदगी चौक येथून कुमठे गावातील कब्रस्तानाकडे रवाना होणार असून, तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

बुरहान कोंडाजी मुल्ला यांच्या निधनाने सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील एक परिचित व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच श्रद्धांजली.


Post a Comment

0 Comments