मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, जनावरांना तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी डिजिटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी आज लोकमंगल साखर कारखान्यासमोर उपोषण सुरू केले. या आंदोलनस्थळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले आणि उपोषणकर्त्यांची भूमिका जाणून घेतली.
दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि पशुपालक अडचणीत सापडले आहेत. जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप अनिल पाटील यांनी केला आहे.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच चारा उपलब्ध होईपर्यंत पशुपालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी उपोषणाचे पाऊल उचलले.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार का आणि प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करणार का, याकडे शेतकरी व पशुपालकांचे लक्ष लागले आहे.



0 Comments