सोलापूर शहर (हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी) – आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, त्याचाच एक भाग म्हणून जोडभावी पेठ पोलिसांनी शनिवारी धडाकेबाज कारवाई करत स्मशानभूमीजवळून पाच नंग्या तलवारींसह एका आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे तसेच सहायक पोलीस आयुक्त पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम धारदार तलवारी घेऊन रुपाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीच्या कंपाउंडजवळ येणार आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. दुपारच्या सुमारास संशयित इसम घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव मल्लिनाथ गुरुलिंगप्पा निरगुडे (वय ४३, रा. भवानीपेठ जम्मावस्ती, सोलापूर) असे सांगितले.
त्याच्या ताब्यातून अंदाजे १४ हजार रुपये किमतीच्या म्यानसह पाच नंग्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणूक काळात लागू असलेल्या जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून आरोपी बेकायदेशीररित्या शस्त्रे बाळगत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय दगडू काटे यांच्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८२/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आरोपीने ही शस्त्रे कुठून आणली, ती विक्रीसाठी होती का, तसेच यापूर्वी शस्त्र विक्री केली आहे का, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माहडीक, पोहेकॉ खाजप्पा आरेनवरु, शीतल शिवशरण, शिवानंद लोहार, बसवराज स्वामी, दत्तात्रय काटे, अभिजीत पवार, निलेश घोगरे, विठ्ठल काळजे, सोमनाथ थिटे, दादासाहेब सरवदे आदी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज मुलाणी यांनी दिली आहे.
निवडणूक काळात शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा धडाका सुरूच असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

0 Comments