Advertisement

Breaking News
Loading...

नव्या पिढीचं भविष्य शिक्षकांच्या हाती... मंद्रूप येथील शैक्षणिक प्रबोधन शिबिरात ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांचे प्रतिपादन...

 


दक्षिण सोलापूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: शिक्षकांनी बदलत्या जमान्यात शिक्षण कसे उपयोगी ठरेल हे पहावे. मुलांना म. गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील समजणार नाहीत. त्यामुळे नव्या पिढीचे भवितव्य तुमच्या हातात आहे. या प्रबोधन शिबिरातून  कमळे गुरुजी यांनी माणसं उभी केली. आज काळ बदलत आहे, तरी काळाशी समरस झाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी केले‌. ते मंद्रूप येथील दी. शि. कमळे गुरुजी शिक्षण संकुलात ४२ वे शैक्षणिक प्रबोधन शिबिर व सौ. निर्मलाताई कमळे आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरणप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोळी होते.


यावेळी  राजा माने म्हणाले, कृषी विद्यापीठाने ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेची चटक लावली. त्यामुळेच आज ग्रामीण भागात  पीएसआय,  तहसीलदार असे अधिकारी निर्माण झाले.


यावेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत प्राचार्य नरेश बदनोरे म्हणाले, जपान जर्मनीची जडणघडण नवीन शिक्षण धोरणामुळे झाली. त्यानंतर चीन, फिनलॅंड यासारखे देश सुद्धा शिक्षणामुळे पुढे आले. धर्मसत्तेला छेद देण्याचे काम वैज्ञानिकांनी केले. धर्मसत्तेला बाहेर फेकल्यानंतर राजसत्ता उदयाला आली. राजसत्तेच्या दुर्गुणामुळे पुढे लोकशाहीचा उदय झाला. आता चौथी औद्योगिक क्रांती सुरू आहे. मात्र त्याविषयी काहीही बोलले जात नाही किंवा बोलू दिले जात नाही. आता समाजाला जागृत करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.


अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रकाश कोळी म्हणाले, नाॅलेज अपडेट करणे आवश्यक आहे. आपण आउटडेटेड होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कमळे गुरुजी प्राथमिक शिक्षक होते. मात्र त्यांचे विचार जागतिक पातळीचे होते. रानावनातल्या लोकांना उभारी देण्याचे काम गुरुजींनी केले. यावेळी सौ. निर्मलाताई कमळे आदर्श शिक्षिका पुरस्कार नूमवि प्रशाला पुणे येथील उपमुख्याध्यापिका स्मिता कांगुणे यांना प्रदान करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव एम. डी. कमळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. जवाहर मोरे यांनी केले. तर आभार खजिनदार प्रा.व्ही. के. पाटील यांनी मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड संदेश कोळी, उपाध्यक्ष डॉ. सी. जी. हविनाळे, सहसचिव प्रा. सुबोध कोळी व विश्वस्त नागेश बिराजदार यांच्यासह संस्थेअंतर्गत असलेल्या सर्व शाळा, कॉलेजचे प्राचार्य व मुख्याध्यापक  उपस्थित होते.


व्याख्यान सत्रात प्रा.डॉ. चंद्रकांत चव्हाण सोलापूर जिल्हा शिक्षण क्षेत्रातील शिल्पकार या विषयावर बोलताना म्हणाले, प्राचीन काळापासून भारतात शिक्षणाला महत्त्व आहे. बहुजनांना शिक्षण देण्यासाठी ज्योतिबा आणि सावित्री फुले यांनी काम केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले. हाच विचार पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी नेला. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचे जाळे उभा केले. सोलापूर जिल्ह्यात होटगी मठ, पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद, शेठ हिराचंद नेमचंद यांनी शिक्षण संस्था उभी केली. बार्शीमध्ये मामासाहेब जगदाळे यांनी शाळा, महाविद्यालय काढून शिक्षण प्रसार केला.
दक्षिण सोलापूर तालुक्यात कमळे गुरुजींच्या विचारातून शिक्षणाचे जाळे उभा राहिले. इथल्या मुलींना उच्च शिक्षणाचे दार खुले झाले. त्यातून शिक्षणाचा विस्तार झाला.

 



तिसऱ्या सत्रात डॉ. जयंत करंदीकर यांनी व्यसन व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मानसिक रुग्ण घराघरात वाढत आहेत. सहनशील त्याच्या अभावामुळे त्यांना वाढतोय. जेवणाला अध्यात्माची जोड दिल्यास जेवण आनंदी राहते. माणसाने किती खाल्ले यापेक्षा त्याला किती पचले महत्त्वाचे त्यावरून आरोग्य ठरते. चांगलं दिसण्यापेक्षा चांगले असणे महत्त्वाचे आहे. सत्राध्यक्ष डॉ सी जी हविनाळे यांनी यथोचित समारोप केला. तदनंतर समारोपप्रसंगी संस्थेच्या विविध शाळांतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.दिवसभर झालेल्या या शिबिराचा अनुभव पी. एम. कमळे व विजय बिज्जरगी यांनी अनुभव व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय साळवे व राजकुमार तेली यांनी केले.




Post a Comment

0 Comments