Advertisement

Breaking News
Loading...

नगरपरिषद–नगरपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस सज्ज; ६१०२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई...

 


सोलापूर ग्रामीण हॅलो रिपोर्टर न्यूज: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ११ नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज, रविवार (दि. २१ डिसेंबर २०२५) जाहीर होत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. या निवडणुका मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल व्ही. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या आहेत.


निकालाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना राबविल्या असून, मा. पोलीस अधीक्षक यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन योग्य त्या सूचना व आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील निवडणूक निकाल शांततेत पार पडावेत, यासाठी आतापर्यंत एकूण ६१०२ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये BNNS कलम १२६ अंतर्गत ३५७१, कलम १२९ अंतर्गत ४४५, कलम १६८ अंतर्गत १४२०, कलम १६३ अंतर्गत ३१६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ९३ अंतर्गत २७९, एम.पी.डी.ए. अंतर्गत ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अंतर्गत ११ टोळ्यांवर तसेच कलम ५६ व ५७ अंतर्गत ४१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


मतमोजणी व निकाल प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भक्कम पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये अपर पोलीस अधीक्षक, ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ पोलीस निरीक्षक, ७५ पोलीस अधिकारी, ८६७ पोलीस अंमलदार, ६५० होमगार्ड, ३ आरसीपी, ४ क्यूआरटी पथके, ८ एसआरपीएफ सेक्शन तसेच ४ स्ट्रायकिंग फोर्सचा समावेश आहे.


याशिवाय जिल्ह्यात ४३ पेट्रोलिंग सेक्टर कार्यान्वित करण्यात आले असून संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट्स नेमण्यात आले आहेत. निकालानंतर कोणत्याही प्रकारची विजय मिरवणूक, बाईक रॅली किंवा अन्य अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.


कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून, बार्शी, सांगोला, पंढरपूर, अकलुज व अन्य संवेदनशील भागांमध्ये ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार असल्याची माहिती मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments