सोलापूर शहर हॅलो रिपोर्टर न्यूज : शहरातील अक्कलकोट रोडवरील संगमेश्वर नगर, मणिधारीसमोर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. वीट गाडी चालकाचा अचानक तोल गेल्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली. धडकेनंतर वीट गाडी रस्त्यावरच पलटी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या अपघातात वीट गाडी क्रमांक MH 46 AR 5705 ने कार क्रमांक MH 13 EC 8725 ला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका भीषण होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली.
अपघातात वीट गाडी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर काही काळ अक्कलकोट रोडवरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.
दरम्यान, या परिसरात यापूर्वीही वारंवार अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. वाहनांचा वेग, अरुंद रस्ता आणि योग्य वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल उभारणे किंवा तातडीच्या वाहतूक सुधारणा करण्याची जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

0 Comments