Advertisement

Breaking News
Loading...

अल्पवयीन पीडीतेवर दुष्कर्म प्रकरणी अटक केलेल्या नृत्य शिक्षकाला उच्च न्यायालयातून जामीन...


 

पंढरपूर हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:|  अल्पवयीन पीडितेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटक झालेल्या नृत्य शिक्षक विशाल दिगंबर पाटोळे (रा. पंढरपूर) यास कोल्हापूर येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. शिवकुमार दिघे यांनी २० हजार रुपयांच्या जातमुचुलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणातील हकीकत अशी की, पीडिता ज्या गल्लीत राहत होती, त्या परिसरातच विशाल पाटोळे हा डान्स क्लास चालवत होता. तो पीडितेस डान्स क्लाससाठी बोलवत असे तसेच दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर चॅटिंगही होत असल्याचे तपासात समोर आले. एप्रिल २०२३ मध्ये आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने पीडितेस घाटावर बोलावून ‘लग्न करतो’ या आश्वासनावर तिच्यावर दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. त्यानंतरही त्याने दोन ते चार वेळा दुष्कर्म केल्याची माहिती पीडितेने दिली.

पीडितेच्या तब्येतीची तक्रार वाढल्याने तिची आई तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली असता ती गरोदर असल्याचे निदर्शनास आले. यानंतर आईने विश्वासात घेऊन विचारले असता पीडितेने संपूर्ण हकीकत सांगितली. त्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली आणि आरोपी विशाल पाटोळे याला अटक करण्यात आली.

जामीन मिळावा म्हणून त्याने प्रथम पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता; मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यावर त्यांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला.

सुनावणीदरम्यान अर्जदाराच्या वतीने ॲड. रितेश थोबडे व ॲड. किरण सराटे यांनी फिर्याद उशिराने दाखल झाल्याचे तसेच गुन्ह्याचा तपास पूर्णत्वास आल्याचे मुद्दे मांडले. हे युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने २० हजार रुपयांच्या जातमुचुलक्यावर जामीन मंजूर केला. सरकारतर्फे ए. एस. चौधरी यांनी काम पाहिले.


Post a Comment

0 Comments