मुंबई प्रतिनिधी (हॅलो रिपोर्टर न्यूज ): भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे आयोजित कार्यक्रमांची तयारी सुरळीत आणि शिस्तबद्ध व्हावी यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायी चैत्यभूमीला भेट देणार असल्याने सुरक्षित, सुलभ आणि सुयोग्य व्यवस्थापनावर भर देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पाहणीदरम्यान स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, वाहतूक आणि पार्किंग व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थापन, दिव्यांगांसाठी सुविधा तसेच गर्दी नियंत्रण यांची सविस्तर तपासणी करण्यात आली.
उपाध्यक्ष बनसोडे यांनी मनपा, पोलिस विभाग, आपत्कालीन सेवा आणि स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना समन्वय ठेवत सर्व यंत्रणा २४ तास सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी ते म्हणाले,“ महापरिनिर्वाण दिन हा देशाच्या सामाजिक, मानवतावादी आणि समतेच्या विचारांचा अंगीकार करण्याचा दिवस आहे. लाखो अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
या पाहणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंददादा चंदनशिवे, उद्योजक तुकाराम गायकवाड, संबंधित विभागांचे अधिकारी, पोलिस कर्मचारी, मनपा प्रशासनातील अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.





0 Comments