Advertisement

Breaking News
Loading...

वडकबाळ पुलावर चोरीच्या संशयातून माणुसकीचा बळी; महिलेला अमानुष मारहाण: मंद्रूप पोलिसांची संवेदनशीलता...

 


वडकबाळ | तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील पुलावर उभी असलेली एक महिला चोर असल्याच्या संशयातून काही ग्रामस्थांनी तिला अमानुषपणे बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे समाजातील माणुसकी कुठे हरवत चालली आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.


सदर महिला रविवारी सोलापूर येथून विजयपूर (कर्नाटक) येथे जाण्यास निघाली होती. मात्र सोलापूरहून आलेल्या रिक्षाचालकाने तिला रात्री 9 वाजेच्या दरम्यान वडकबाळ येथील पुलावर उतरवले. त्यानंतर ती महामार्गावर जाणाऱ्या वाहनांकडे लिफ्ट मागत उभी होती. मात्र कोणत्याही वाहनचालकाने तिला प्रतिसाद दिला नाही.


दरम्यान, गावातील काही लोकांना ही महिला संशयास्पद वाटल्याने तिला चोर समजून मारहाण करण्यात आली. मारहाणीच्या वेळी स्वतःच्या संरक्षणासाठी तिने चाकू दाखवल्याने संशय अधिक बळावला आणि मारहाण आणखी वाढवण्यात आली. वास्तविक संशय वाटल्यास थेट पोलिसांना कळवणे अपेक्षित होते, मात्र प्रथम महिलेला मारहाण करून नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.


घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन मंद्रूप पोलीस ठाण्यात दाखल केले. पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी करवून घेतली. तसेच सखोल चौकशी केली असता ती महिला वाट चुकलेली असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तिच्यावर आवश्यक उपचार करून तिला ‘सखी’ संस्थेच्या मदतीने सुरक्षित आधार उपलब्ध करून दिला. या घटनेमुळे केवळ संशयाच्या आधारे कायदा हातात घेणे किती धोकादायक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


या संपूर्ण घटनेत मंद्रूप पोलिसांनी दाखवलेली तत्परता, महिलेबाबतची काळजी आणि संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली. संशयाऐवजी वास्तव समजून घेण्यावर भर देत पोलिसांनी संबंधित महिलेला वैद्यकीय उपचार, सुरक्षित वातावरण आणि समुपदेशन उपलब्ध करून दिले. तसेच ‘सखी’ संस्थेच्या माध्यमातून तिला आवश्यक सामाजिक आधार देण्यात आला. यामुळे कायदा आणि माणुसकी यांचा समतोल साधत मंद्रूप पोलिसांनी आपली जबाबदारी प्रगल्भपणे पार पाडल्याचे दिसून आले.


संशयाच्या गर्दीतही मंद्रूप पोलिसांनी संवेदनशीलता हरवू दिली नाही, हे या घटनेतून स्पष्ट झाले.


अधिक तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.



Post a Comment

0 Comments