Advertisement

Breaking News
Loading...

आधुनिक शेतीकडे वाटचाल; मंद्रूपमध्ये श्री मळसिद्ध कृषी प्रदर्शन २०२६ चे मान्यवरांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन...

 


मंद्रूप|प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे स्व. महादेव म्हेत्रे क्रिकेट मैदानावर भरवण्यात आलेल्या श्री मल्लसिद्ध कृषी प्रदर्शन २०२६ चे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.


उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती व शेतीपूरक उद्योगांचा स्वीकार करून उत्पादनवाढीसह उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


या कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, महाराष्ट्र राज्याचे सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲड. राजेश देशमुख, श्री मळसिद्ध देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, तमण्णा पुजारी, मळसिद्ध पुजारी, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील, सुनील व्हनमाने, बिळेणसिध्द सुंटे, राधाकृष्ण गोसावी, रवीशंकर म्हेत्रे, अनंत म्हेत्रे, चंद्रकांत देशमुख, बाबुशा शेंडगे, सुरेश टेळे, अविनाश देशमुख, सोमनिंग पुजारी, बनसिध्द पुजारी, बिळेणी पुजारी, शिवानंद पुजारी, अनिकेत पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मंद्रूप येथे १३ ते १५ जानेवारी या कालावधीत हे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनात ७० हून अधिक विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्समध्ये अत्याधुनिक शेती अवजारे, सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके, ठिबक व तुषार सिंचन प्रणाली, शेती यंत्रसामग्री तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी आवश्यक साहित्य शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे.



या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती, शेतीतील खर्च कसा कमी करावा, उत्पादन कसे वाढवावे याबाबत मार्गदर्शन मिळणार असून तरुण शेतकरी, महिला बचत गट व शेतीपूरक उद्योग करणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन लाभदायक ठरणार आहे.


शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन नव्या संधींचा लाभ घ्यावा व शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि नफ्याची करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री मळसिद्ध देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments