अक्कलकोट | प्रतिनिधी अमोल फुलारी :
महाराष्ट्र राज्य कला परीक्षा संचलनाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत 'श्री महादेव विद्या मंदिर प्रशाला बोरगांव (दे), ता अक्कलकोट यांनी आपला यशाचा आलेख उंचावत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.
प्रशालेतील एकूण २८ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या सर्वांनी सुयश संपादन केले असून, २८ पैकी २६ विद्यार्थ्यानी'अ' (A Grade) श्रेणी मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत २८ पैकी एलिमेंटरी परीक्षेत १६ तर इंटरमिजिएट परीक्षेत १० विद्यार्थीनी असे २६ विद्यार्थी ए ग्रेडने उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशात प्रशालेचे कला शिक्षक अमोल फुलारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी वर्षभर विद्यार्थ्यांकडून घेतलेला सराव आणि रेखाकलेच्या विविध तंत्रांचे दिलेले शिक्षण यामुळेच हे यश शक्य झाल्याचे प्रशालेतर्फे सांगण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राम देशेट्टी, सचिव प्रा दत्तात्रय फुलारी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रभाकर बंदीछोडे, पांडुरंग पवार, रशिद पठाण, शाम देशेट्टी, संजीवकुमार हत्तरके, विजयकुमार चव्हाण, अमोल फुलारी, आनंद सूतके, अनिल देशेट्टी, गुरुनाथ धनशेट्टी, दत्तात्रय मोरे, काशीनाथ जिरगे व माता पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
"विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमची प्रशाला नेहमीच प्रयत्नशील असते, या निकालाने आमच्या कष्टाचे चीज झाले आहे," अशी भावना मुख्याध्यापकांनी व्यक्त केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या यशाबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

0 Comments