करमाळा | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ शेतकऱ्याची ३ तोळे वजनाची सोन्याची चैन (कि.अं. ४,५०,००० रुपये) फसवणूक करून लंपास करणाऱ्या चौघा आरोपींना करमाळा पोलिसांनी अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.
दिनांक २० जून २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास रविंद्र शंकर देशमुख (वय ६५, रा. वांगी नं. १, ता. करमाळा) हे मोटारसायकलवरून जात असताना खडकेवाडी फाट्याजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवून स्वतःला पोलीस असल्याचे सांगितले. “पुढे खून झाला आहे, तुमच्याकडील सोने सुरक्षित पिशवीत ठेवा,” असे सांगून विश्वास संपादन करत त्यांनी सोन्याची पिशवी फसवणुकीने घेतली व पलायन केले. या प्रकरणी गुन्हा र. नं. ४९७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३१८(४), २०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपी जहीर अब्बास अली याच्याकडून अंदाजे ३ तोळे वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव, पोलीस हवालदार अजित उबाळे, पोलीस नाईक मनीष पवार, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल गणेश खोटे, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे व अमोल रंदिल यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार पाखरे करीत आहेत.


0 Comments