Advertisement

Breaking News
Loading...

हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू; घातपाताचा संशय...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा हिप्परगा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अनिकेत केवल बाबरे (वय १७, रा. मिलिंद नगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो चंडक महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. शनिवारी त्याने शेवटचा पेपर दिल्यानंतर रविवारी मित्रांसोबत रंग खेळण्यासाठी बाहेर पडल्याची माहिती मिळाली.

दुपारी चार ते पाच मित्रांसोबत रंग खेळल्यानंतर अनिकेत व त्याचे मित्र हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेले. तलावात उडी मारल्यानंतर अनिकेत पाण्यात अडकला आणि तो बाहेर येऊ शकला नाही. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याने मित्रांनी व गावकऱ्यांनी शोध सुरू केला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तलावात शोध मोहीम राबवून अनिकेतला बाहेर काढले. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, अनिकेतसोबत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून अधिक तपास सुरू आहे.

अनिकेतच्या पश्चात आई, वडील तसेच एक मोठा व एक लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



Post a Comment

0 Comments