गंगेवाडी | हॅलो रिपोर्टर न्यूज | डॉ. राजदत्त रासोलगीकर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील बंद पडलेल्या खाणीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चौथीतील चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी घडली. यश हरी हब्बू (वय १०, रा. कासेगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यश हा कासेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. गुरुवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर दुपारी सुमारे एक वाजता तो आपल्या वर्गातील काही सवंगड्यांसोबत गंगेवाडी येथील गट क्रमांक २२२/१ मधील बंद पडलेल्या खाणीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला.
दरम्यान, यशला पोहता येत नसताना तो पाण्यात उतरला. पाय घसरल्याने तो अचानक खोल पाण्यात पडून बुडाल्याची माहिती मिळत आहे. सदर खाण सुमारे ७० ते ८० फूट खोल असल्याने काही क्षणातच तो पाण्यात दिसेनासा झाला. सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच सोलापूरहून अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र अथक प्रयत्न करूनही शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत मृतदेह हाती लागू शकला नव्हता.
या शोध मोहिमेत तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय घोडके, हेड कॉन्स्टेबल रशीद बाणेवाले, सर्कल अधिकारी माळी, आरिफ हुडीवाले यांच्यासह प्रशासनाचे कर्मचारी प्रयत्न करत असून कासेगावचे ग्रामस्थ व सरपंचही शोधकार्याला मदत करत आहेत.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे कासेगाव परिसरात शोककळा पसरली असून धोकादायक बंद खाणीभोवती सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


0 Comments