Advertisement

Breaking News
Loading...

थकीत ऊसबिलासाठी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयावर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभा, सोलापूर जिल्हा संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सुभाष बावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील अनेक साखर कारखान्यांकडे मागील तसेच चालू हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर ऊसबिल थकीत आहे. मागील हंगामात गाळप झालेल्या ऊसाचे पैसे अनेक कारखान्यांकडून अद्याप देण्यात आलेले नाहीत. वारंवार मागणी करूनही शेतकऱ्यांना थकीत बिलाचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सध्या शेतीचा वाढता खर्च, कर्जफेड, खत-बियाणे, औषधे, मजुरी, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह या जबाबदाऱ्यांमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत कारखान्याकडून ऊसबिल देण्यास होणारा विलंब शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर घालत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

शासनाच्या नियमांनुसार ऊस पुरवठ्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना बिल अदा करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक कारखान्यांकडून हा नियम पाळला जात नसल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने सहसंचालकांना निवेदन देण्यात आले.


मुख्य मागण्या :

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत ऊसबिल तात्काळ अदा करावे.

बिल देण्यास झालेल्या विलंबाबद्दल शेतकऱ्यांना व्याजासह रक्कम द्यावी.

शासनाच्या नियमानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपी प्रमाणे ऊसबिल देण्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.

ज्या कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे बिल थकीत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनात सीटूचे महासचिव ॲड. एम. एच. शेख, पक्षाचे जिल्हा सचिव युसुफ शेख, किसान सभा जिल्हा सचिव कॉ. सुलेमान शेख, युवा महासंघाचे सचिव अनिल वासम यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दत्ता चव्हाण (जिल्हा सहसचिव) यांनी केले. यावेळी कार्याध्यक्ष स्वामीनाथन शिरगुरे, राजेंद्र स्वामी, कॉ. जावेद आवटे, दयानंद फताटे, चिंदानंद बगले, शिकंदर मकानदार, तुकाराम माळेवाडी, पैगंबर नदाफ, मलशिद माशाळे, अरुण शिंदे, मल्लिनाथ माकने, नागपा कुरणे आदी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments