सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : क्रिप्टो ट्रेडिंगमधून प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सोलापूरमधील नागरिकाची तब्बल ७२ लाख ६४ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुख्य सूत्रधाराला सोलापूर शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. जवळपास वर्षभर फरार असलेल्या या आरोपीला दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणातील आरोपी रोज मगर थापा (वय २३, रा. नेपाळ) हा नेपाळमध्ये राहून चिनी व नेपाळी साथीदारांच्या मदतीने भारतातील नागरिकांना क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगमध्ये १० ते ३०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. त्याने फिर्यादीकडून टप्प्याटप्प्याने सुमारे ७२ लाख ६४ हजार रुपये गुंतवणुकीच्या नावाखाली उकळले.
याप्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्यात मे २०२५ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपी विविध राज्यांमध्ये राहून भारतीय नागरिकांच्या बँक खात्यांचा वापर करून फसवणुकीची रक्कम इतर खात्यांमध्ये वर्ग करत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीसांनी आरोपीच्या पासपोर्टच्या आधारे त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केली होती. त्यानुसार ८ मार्च २०२६ रोजी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.
या गुन्ह्यात आतापर्यंत चार आरोपी निष्पन्न झाले असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर सायबर पोलीस पथकाने केली.
नागरिकांना आवाहन :
क्रिप्टो ट्रेडिंग किंवा ऑनलाईन गुंतवणुकीत जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. बँक खाते, एटीएम, सिमकार्ड किंवा ओटीपीची माहिती कोणालाही देऊ नये. फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


0 Comments