Advertisement

Breaking News
Loading...

🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..! पौर्णिमेच्या शितल चांदण्यातील प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड सर..

 



🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!

पौर्णिमेच्या शितल चांदण्यातील प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड सर..


अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वयाची ३० वर्ष देणारे महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड सर यांच्या सेवापूर्ती निमित्त रवी देवकर यांनी दिलेल्या शब्दशुभेच्छा..!

चंद्राला तापलेले कोणीही पाहिले नाही. त्याचप्रमाणे प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड सर कधी चिडले, संतापले किंवा अपशब्द बोलले, असे कोणीही अनुभवले नाही. त्यामुळे त्यांच्या स्वभावाला पौर्णिमेच्या शीतल चांदण्याची उपमा देणे योग्य ठरेल. बोधिप्रकाश हे व्यक्तिमत्त्व असेच शांत, संयमी आणि तेजस्वी आहे.

महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर सर यांनी त्यांना संघटनेत आणले, तर नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ, कासेगाव या संस्थेचे सचिव दिलीप चौगुले( दाजी) यांनी शाळेत सहशिक्षक पदाची संधी दिली. या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आणि आरोग्यदूत मंगेश (दादा) चिवटे, प्रा.डॉ.बापूसाहेब आडसूळ सर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड सरांचा सपत्नीक झालेला सत्कार हा सहस्त्रचंद्र दर्शनापेक्षाही मोठा योग ठरला.

शिक्षक संघटनेत अनेक चांगले पदाधिकारी होऊन गेले आणि येणाऱ्या काळात अजून काही चांगले पदाधिकारी आपल्याला दिसतील; परंतु गेल्या ३० वर्षांपासून महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघात निष्ठावान पदाधिकारी म्हणून गायकवाड सरांनी कार्य केले आहे. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर सर यांच्या सोबत सावलीप्रमाणे उभे राहून त्यांनी अनेक अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांच्याकडून निरंतर घडत होते व घडत आहे.

संघटनेकडे येणारा प्रत्येक सभासद विविध समस्यांनी ग्रासलेला असतो. मात्र, बोधिप्रकाश गायकवाड यांच्याकडे आलेली व्यक्ती कधीही निराश होत नाही. कारण त्यांच्या नावावरच विश्वास आहे. समस्या मार्गी लागणारच. त्यांनी केलेल्या निस्वार्थी आणि निष्ठावान कार्यामुळे त्यांच्या भोवती पदाधिकारी व सभासदांची भक्कम फळी उभी राहिली आहे. एखादी व्यक्ती स्वतःचा विषय विसरू शकते, पण सर मात्र तो विषय लक्षात ठेवून मार्गी लावण्यासाठी तत्पर असतात.

गायकवाड सरांची संघटनेत "मालक" असा जयघोष होणे ही त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष आहे. ही लोकप्रियता सहज मिळालेली नसून, अन्यायग्रस्तांना दिलेल्या न्यायाचीच ती पावती आहे. तीस वर्षातील अनेक अन्यायग्रस्त शिक्षक व कर्मचारी यांना मिळवून देणारा न्याय आहे. " बहुजनांच्या हक्कासाठी व अस्मितेसाठी " हीच इष्टानिष्टतेची कसोटी समजून ते आपले जीवन जगत आहेत. शब्दापेक्षा कृतीवर भर देणारा माणूस आणि संघटनेच्या उभारणीत असणाऱ्या त्यांच्या या मोठ्या योगदानामुळे 'मालक' म्हणून त्यांचं नाव संघटनेत कायमचं कोरले आहे.

"शब्द कमी... कृती अधिक" हेच त्यांचे ब्रीदवाक्य..!

शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यासोबतच्या बैठकीत प्रश्न मांडताना त्यांच्या बोलण्यात स्पष्टता आणि कृतीत सातत्य दिसते. कोणतीही जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने पार पाडली आहे.

आजपर्यंत त्यांनी शेकडो शिक्षक व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ वैयक्तिक न राहता सार्वजनिक स्वरूपाचे झाले आहे. एखादी व्यक्ती पदामुळे नव्हे, तर विचार, कार्यपद्धती आणि समाजावर केलेल्या परिणामामुळे मोठी ठरते. याचं मूर्त स्वरूप म्हणजे प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड.

शाळेतही त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात कधीही प्राचार्य पदाचा गर्व दिसला नाही. मी किती मोठा... असा कोणताही प्रकारचा भाव दिसून आला नाही. ते सर्वांशी सलगीने वागत, माणसे जोडत पुढे गेले.

जन्मदात्या आई-बाबा कडून रोज मिळणाऱ्या पोटभर अन्नाच्या शिदोरीप्रमाणे आयुष्यभर पुरेल अशी संस्काराची आठवणींची आणि मूल्याची शिदोरी गायकवाड सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दिलेली आहे.  २०२२ पासून आजतागायत त्यांनी उत्कृष्ट प्रशासन आणि नियोजन कौशल्यातून आदर्श मुख्याध्यापक पदाची उंची वाढवली आहे. कोणत्याही यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता टीमवर्कवर भर देणे ही त्यांची खासियत आहे.

सहशिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास करत त्यांनी आयुष्य ज्ञानदानासाठी वाहिले. त्यांच्या हाताखालून शिकलेले विद्यार्थी आजही त्यांना आदर्श मानतात.

कवी कुसुमाग्रज यांच्या ओळीप्रमाणे— "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा" —अशी प्रेरणा देणारे गायकवाड सर विद्यार्थ्यांना बळ देणारे मार्गदर्शक ठरले आहेत. शाळेत प्रशासकीय कामकाज करत असताना सर्वांनी कधीही रिकाम्या पाट्या टाकल्या नाहीत तर त्यांनी सतत जबाबदारीची जाणीव व कर्तव्यनिष्ठांनी भरलेल्या पाट्या टाकल्या आहेत.

संघटना, शाळा आणि संस्था यांसोबतच बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था, सोलापूर या माध्यमातूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. २०२२ साली चेअरमनपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पतसंस्थेला प्रगतीच्या मार्गावर नेले. विस्तारीकरण तसेच विशेषतः टप्पा अनुदानित शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना कर्जपुरवठा आणि शंभर टक्के वसुली करून सभासदांना लाभांश देणे हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.

सरांना चेअरमन पदाचा अहंकार कधीच स्पर्शून गेला नाही. प्रत्येकाशी आपुलकीने वागणारे हे व्यक्तिमत्त्व खरोखरच प्रेरणादायी आहे. कोणत्याही संस्थेच्या प्रमुखपदी अशी व्यक्ती असेल, तर त्या संस्थेची प्रगती निश्चित असते.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले आणि कासेगाव कनिष्ठ महाविद्यालय कासेगाव या प्रशालेच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षण, मानसशास्त्र आणि अनुभव यांच्या आधारावर त्यांनी उत्कृष्ट कार्यपद्धती विकसित केली आहे.

त्यांनी घडवलेले विद्यार्थी, त्यांचे पालक, सहकारी शिक्षक, कर्मचारी आणि संघटनेतील पदाधिकारी.. हे सर्वच त्यांना कधीही विसरणार नाहीत.


                   रवी देवकर...


Post a Comment

0 Comments