नांदणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
सोलापूर-विजापूर महामार्गावर नांदणी गावच्या हद्दीत जिओ पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने उत्तर प्रदेशातील एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंद्रूप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत फिरतलाल परदेशी नागर (वय 45, रा. राजेपूर, जलालपूर, जौनपूर, उत्तर प्रदेश) हे लोकशक्ती साखर कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. त्यांच्यासोबतचे सहकारी शिवपूजन महावीर नागर (वय 46) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.50 वाजता दोघेही बसवनगर येथून किराणा सामान घेऊन पायी कारखान्याकडे परत येत होते.
नांदणी गावाच्या शिवारातील जिओ पेट्रोल पंपाजवळ सोलापूरकडून भरधाव वेगाने आलेल्या हुंदाई व्हर्ना (क्र. MH-01-BU-1905) या कारने रस्त्याच्या साईड पट्टीवर चालणाऱ्या फिरतलाल नागर यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले.
घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर कार थांबली होती. त्यावेळी चालकाने स्वतःचे नाव अबुसुफियान शेख (रा. सोलापूर) असे सांगितले. त्यानंतर तो कारसह घटनास्थळावरून निघून गेला.
या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात कार चालक अबुसुफियान शेख याच्याविरुद्ध निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मंद्रूप पोलीस करीत आहेत.
0 Comments