कुडल , दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुडल येथे अनुसूचित जातीतील व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यासह भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निजलिंगप्पा रामा सूर्यवंशी (वय 48, रा. कुडल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते गावातील मारुती मंदिरासमोरील कट्ट्यावर बसले असताना आरोपी संगप्पा गुरुशांत पाटील याने फिर्यादीला जातीवाचक शब्दांत अपमानित करत तेथे बसू नये, असे सांगितल्याचा आरोप आहे.
त्यानंतर फिर्यादी घरी आल्यानंतर शांतप्पा आण्णाराव पाटील, केदार शांतप्पा पाटील, संगमेश रामचंद्र बगले, बसवराज रामचंद्र बगले आणि संगप्पा गुरुशांत पाटील हे फिर्यादीच्या घरासमोर आले. त्यांनी पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी व चपलेने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून त्यांना सोडविण्यास आलेल्या त्यांच्या आईलाही जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 189(2), 190, 191(2), 191(3) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, 1989 मधील कलम 3(1)(r) व 3(1)(s) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


0 Comments