रविवारचा चहा क्रमांक- २१३
आयुष्य: एक अनोखा सापशिडीचा खेळ...
लहानपणी सगळ्यांनी सापशिडी खेळली असेल. एक रंगीत पट, त्यावर चढत्या शिड्या आणि उतरणारे साप. फासा हात घेऊन आम्ही डोळे मिटून प्रार्थना करायचो, सहा येवो. कधी सहा यायचा, कधी एकावरच अडकायचो. त्यावेळी वाटायचं हा फक्त वेळ घालवण्याचा खेळ आहे. मोठे झाल्यावर मात्र समजतं, आयुष्य स्वतःच त्या पटासारखं आहे. आपण सगळे प्यादे आहोत, आणि वर कोणीतरी अदृश्य हाताने फासे टाकत आहे.
खेळ सुरू होतो तेव्हा सगळे एकाच घरापासून निघतात. शून्यावरून एककडे. कुणाकडे श्रीमंतीची शिडी असते, कुणाकडे संघर्षाचा साप. पण सुरुवात मात्र सगळ्यांची सारखीच असते. पुढे जायचंय ही एकच धडपड कॉमन असते.
फासा म्हणजे काय? तो म्हणजे नशिबाचा, योगायोगाचा, क्षणाचा ठोका आहे. कधी तुम्ही प्रचंड मेहनत करता आणि फासावर दोन पडतो. कधी काहीच न करता सहा मिळतो. आपण याला योग म्हणतो, प्रारब्ध म्हणतो, नशीब म्हणतो. पण खरं म्हणजे फासा हा आपल्या हात कधीच नसतो. आपल्या हातात फक्त फासा टाकण्याची हिंमत असते. पुन्हा पुन्हा उठून खेळण्याची जिद्द असते.
या पटावरचा सगळ्यात सुंदर भाग म्हणजे शिड्या. शिड्या म्हणजे माणसं. आयुष्यात असे काही लोक येतात जे न मागता हात पुढे करतात. एक शिक्षक असतो जो तुम्हाला पहिल्यांदा विश्वास देतो. एक मित्र असतो जो पडल्यावर हसून म्हणतो, चल पुन्हा. एक अनोळखी माणूस असतो जो गर्दीतून रस्ता करून देतो. ही सगळी शिडीच आहे. तुम्ही दहावर होता आणि थेट पंचवीसवर पोहोचता. त्या क्षणी वाटतं आयुष्य किती सोपं आहे. आपण कृतज्ञ होतो. त्या शिडीला मनापासून नमस्कार करतो. कारण आपल्याला माहिती असतं, ही शिडी नसती तर अजूनही आपण तिथेच घुटमळत असतो.
पण जिथे शिडी आहे तिथे सापही आहे. आणि सापाची गंमत अशी की तो बहुतेकदा शिडीच्या अगदी जवळच असतो. ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, तोच कधीतरी पाठीत खंजीर खुपसतो. ज्यासाठी आपण रात्रंदिवस राबतो, तीच गोष्ट एका चुकीमुळे हातून निसटते. ज्याला आपण आपलं सर्वस्व मानतो, तोच एका दिवशी परका होतो. साप चावतो तेव्हा फक्त जागा दुखत नाही, मनही घायाळ होतं. आपण थेट ९८ वरून १३ वर येतो. आणि त्या क्षणी सगळ्यात पहिला प्रश्न पडतो, मी कुठे चुकलो?
उत्तर नसतं. कारण सापशिडीत चूक आणि बरोबर असं काही नसतं. फासा पडला आणि सापाच्या तोंडाशी गेला, एवढंच. पण या पडण्यातही एक भेट असते. वेदना. आणि वेदना ही जिवंत असण्याची खूण आहे. ज्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, तो काय रडणार? आपण रडतो कारण आपल्याजवळ प्रेम होतं, स्वप्न होतं, मेहनत होती. हरवण्याचं दुःख म्हणजे आपण समृद्ध होतो याचा पुरावा आहे. रिकाम्या हाताला काय जखम होणार?
माणसाचा स्वभावच असा आहे. त्याला नेहमी पाचची अपेक्षा असते. फासावर दोन आले की तो आकाश पाताळ एक करतो. नशीबाला, देवाला, परिस्थितीला दोष देतो. आणि कधी कधी चमत्कार होतो. तीनची अपेक्षा असताना सहा मिळतो. तेव्हा आनंदाने पाय जमिनीवर टेकत नाहीत. पण या सहाच्या आनंदातही एक भीती लपलेली असते. आता हे टिकवायचं कसं? गमावलं तर? जास्त मिळाल्यावर जबाबदारी वाढते. आणि म्हणूनच म्हणतात, कमी मिळून रडणारा माणूस जास्त मिळूनही रडतो.
या खेळाचा दुसरा नियम म्हणजे तो कधीच थांबत नाही. तुम्ही जिंकला तरी पुढचा डाव असतो, हरला तरी पुढचा डाव असतो. दहा वर पोहोचला तरी खेळ संपत नाही, कारण आयुष्याचा खरा दहा कुठे आहे हे कोणालाच माहिती नाही. कदाचित दहा हा आकडा नसून तो प्रवास आहे. चालत राहणं आहे.
सगळ्यात महत्वाचं शिकवण या खेळातून एकच मिळते. अंकावर शून्य नसतं. फास्यावर एक ते सहा पर्यंतच अंक असतात. याचा अर्थ आयुष्यातला एकही दिवस, एकही क्षण व्यर्थ जात नाही. त्या दिवशी तुम्हाला यश मिळालं नाही तरी अनुभव मिळतो. ती व्यक्ती भेटली नाही तरी धडा मिळतो. तो दरवाजा बंद झाला तरी दुसरा खिडकी उघडतो. काहीच न मिळालं तरी तुम्ही एक दिवस जगला, श्वास घेतला, शिकलात. हे देखील कमी नाही.
आपण बघतो, काही लोक नऊवर पोहोचून सापाच्या तोंडी जातात आणि तिथेच खेळ सोडून देतात. म्हणतात, आता नको. दमलो. आणि काही लोक परत एकवर येऊनही हसून फासा उचलतात. त्यांना माहिती असतं, शिडी कुठेतरी आहे. ती शोधायची आहे. पडणं हा शेवट नाही, पडून न उठणं हा शेवट आहे.
म्हणूनच आयुष्याकडे तक्रार म्हणून न बघता खेळ म्हणून बघावं. शिडी मिळाली की गर्व नको, सापाने गिळलं की निराशा नको. दोन्ही तात्पुरते आहेत. आजची शिडी उद्याचा साप होऊ शकते, आणि आजचा साप उद्या तुम्हाला अधिक मजबूत करून जातो.
आपल्या आजूबाजूला बघा. प्रत्येकाच्या पटावर वेगळे साप आणि वेगळ्या शिड्या आहेत. कुणाचा साप पैसा आहे, कुणाचा साप नातं आहे, कुणाचा साप आजार आहे. कुणाची शिडी कला आहे, कुणाची शिडी कुटुंब आहे, कुणाची शिडी एक छोटंसं यश आहे. आपण दुसऱ्याचा पट बघून आपला पट तोलू शकत नाही. कारण फासे सगळ्यांसाठी वेगळे पडतात.
आणि शेवटी जेव्हा खेळ संपतो, तेव्हा काय होतं? पट गुंडाळला जातो. साप आणि शिडी दोन्ही एकाच डब्यात जातात. मागे उरतं ते फक्त तुम्ही कसा खेळलात. रडत रडत खेळलात की हसत खेळलात. इतरांचं पाय ओढलं की त्यांना शिडी दाखवली. घाबरून बसला की फासा उचलला.
म्हणूनच प्रत्येक सकाळी उठून आपण नवा फासा टाकतो. माहिती नसतं पुढे काय आहे. कदाचित शिडी असेल, कदाचित साप. पण टाकल्याशिवाय कळणार तरी कसं?
आयुष्य तुम्हाला दोनच गोष्टी देतं. एकतर यश, नाहीतर अनुभव. आणि दोन्हीही संपत्तीच आहेत. यशाने तुम्ही उंच जाता, अनुभवाने तुम्ही खोल होता. उंची आणि खोली दोन्ही मिळाली की माणूस पूर्ण होतो.
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला सापाने खाली खेचेल, तेव्हा रडत बसू नका. आजूबाजूला बघा. कदाचित दोन घरांवरच दुसरी शिडी असेल. आणि जेव्हा शिडी मिळेल, तेव्हा तिच्यावरून घाईने वर जाऊ नका. मागे वळून बघा. कोणाला हात द्यायचा आहे का.
कारण शेवटी हा खेळ एकट्याचा नाही. आपण सगळे एकाच मोठ्या पटावर खेळतोय. कुणाला वर जायला मदत केली, तर आपल्यालाही कुणीतरी मदत करायला येतं.
तर मित्रा, फासा हात घे. डोळे मिटून टाक. आणि जे येईल ते स्वीकार. कारण शून्याचा अंक इथे नाही. एक तरी पडणारच. आणि एक म्हणजे एक नवीन सुरुवात. एक नवीन संधी. एक नवीन दिवस.
खेळ संपेपर्यंत खेळत राहा. पडलात तरी उठा. चढलात तरी नम्र राहा. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा पट गुंडाळला जाईल, तेव्हा अभिमानाने म्हणता यावं, मी खेळलो. पूर्ण ताकदीने खेळलो.
कारण आयुष्य सापशिडी सारखं आहे. आणि हीच त्याची गंमत आहे.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव,सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.


0 Comments