मंद्रुप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. 15 : कंदलगावजवळील शेत परिसरात झालेल्या वादातून एका रिक्षाचालकाला काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पटवारी करीत आहेत.
मंद्रूप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लालसाब रुकमोद्दीन शेख (वय 28, रा. मंद्रुप) हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. 11 जुलै 2026 रोजी दुपारी त्यांना ओळखीच्या मदिना निघेवान यांनी कंदलगाव येथे कामाचे पैसे आणण्यासाठी रिक्षासह येण्यास सांगितले. कत्री चौकातून पेमा चव्हाण यांनाही रिक्षात घेतल्यानंतर सर्वजण कंदलगाव पुढील अकोले रस्त्यालगतच्या शेताजवळ गेले.
सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींमध्ये वाद सुरू झाला. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करत असताना सद्दाम अहमद सय्यद याने फिर्यादीच्या तोंडावर हाताने तसेच काठीने उजव्या पायावर मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हनुमंत नानाजे यानेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मदिना निघेवान यांनीही मारहाण केली, तर पेमा चव्हाण यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जखमी झालेल्या लालसाब शेख यांनी नंतर परिचितांच्या मदतीने मंद्रुप पोलीस ठाणे गाठले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सद्दाम अहमद सय्यद, हणुमंत नानाजे (दोघे रा. कंदलगाव), मदिना निघेवान व पेमा चव्हाण (दोघी रा. मंद्रुप) यांच्याविरुद्ध मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


0 Comments