Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलीस ठाण्यात पक्ष्यांसाठी ‘जलपात्र’ उपक्रम; निसर्गप्रेमाचा अनोखा संदेश...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना पाण्याची सोय व्हावी या उद्देशाने मंद्रूप पोलीस ठाणे परिसरात झाडांवर पक्ष्यांसाठी जलपात्र बांधण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर संकेत देवळेकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी पोलीस पाटील प्रविण राठोड यांनी पुढाकार घेत पोलीस स्टेशन आवारातील अनेक झाडांवर पक्षी-जलपात्र लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.


उपक्रमावेळी बोलताना संकेत देवळेकर म्हणाले की, संत तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलेले “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हे वचन मानव आणि निसर्ग यांच्यातील अतूट नाते दर्शवते. झाडे, वेली, पक्षी आणि प्राणी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून त्यांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

झाडांमुळे सावली, फळे, औषधे मिळतात तसेच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. आज जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदलामुळे पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने निसर्गाशी प्रेमाने वागून त्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी पोलीस पाटील प्रविण राठोड यांनी राबविलेल्या पक्षी-जलपात्र उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांत सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

या प्रसंगी मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, पीएसआय राजू डांगे, पक्षीमित्र प्रविण राठोड, पोलीस कर्मचारी तसेच मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments