रविवारचा चहा क्रमांक- २०१
नात्यांची खरी ओढ..!
आयुष्याच्या प्रवासात शेकडो माणसं भेटतात. प्रवासात शेजारी बसलेला प्रवासीही आपल्या सोबत असतो, पण तो सोबत देणारा नसतो. शरीराने जवळ असणं आणि मनाने पाठीशी उभं राहणं यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
अनेकदा नात्यात माणसं केवळ औपचारिकता म्हणून सोबत असतात. एकाच घरात राहणारे किंवा सोशल मीडियावर लाईक करणारे मित्र तांत्रिकदृष्ट्या सोबत असतात, पण संकटाच्या काळात ही गर्दी ओसरू लागते. केवळ सोबत असणारी माणसं सुखात टाळ्या वाजवतात, पण दुःखाच्या वादळात सुरक्षित अंतर राखतात.
याउलट, सोबत देणं ही वेगळी साधना आहे.
तुमच्या शांततेमागचं कारण ओळखणं म्हणजे सोबत देणं.
"मी आहे ना" हे केवळ न बोलता, हक्काचा वेळ राखून ठेवणं म्हणजे सोबत देणं.
कोणत्याही अपेक्षे विना संघर्षात आपला हात समोरच्याच्या हातावर ठेवणं म्हणजे खरी सोबत.
माझ्या अनुभवाने हेच शिकवलं की, नात्यात ओढ असली की वेळ मिळतोच. पण तो वेळ केवळ उपस्थिती साठी नसावा, तर आधार देण्यासाठी असावा. तुमच्या मागे लोकांची किती मोठी रांग आहे यापेक्षा, संकटात तुमच्या डोळ्यात डोळे घालून "घाबरू नकोस, मी आहे ना!" म्हणारं कोण सोबत आहे, हे महत्त्वाचे.
माणसं जोडण्यापेक्षा ती सोबत देणारी बनवणं कठीण आहे. त्यासाठी स्वतः आधी कोणाचं तरी सोबत देणारं माणूस बनावं लागतं. आपण निस्वार्थ झालो की, जीवाला जीव देणारी माणसं निसर्गाच्या नियमानुसार आपोआप आयुष्यात येतात.
गर्दीत राहण्यापेक्षा अशा एखाद्याच्या काळजात राहा, जो तुमच्या पडत्या काळात तुमची सावली होईल. प्रवास किती मैल केला यापेक्षा, तो कोणाच्या सोबतीने केला, यावरच जगण्याचं समाधान अवलंबून असतं.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव,सांगली
सचिव
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली .
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..! 9923393329

0 Comments