छत्रपती संभाजी नगर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठाकूर अनुसूचित जमाती (ST) संदर्भातील एका महत्त्वपूर्ण प्रकरणात अर्जदाराच्या बाजूने निर्णय देत स्क्रुटिनी कमिटीचा आदेश रद्द केला आहे.
संदीप श्रीकांत अहिरे यांनी जेष्ठ विधिज्ञ् ॲड. सुशांत येरमवार साहेब यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी 24 मे 2017 रोजीच्या जात पडताळणी समितीच्या निर्णयाला आव्हान दिले होते. या समितीने त्यांचा ‘ठाकूर’ अनुसूचित जमातीचा दावा नाकारला होता.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, अर्जदाराने सादर केलेले 1938 सालापासूनचे जुने (स्वातंत्र्यपूर्व) दस्तऐवज स्पष्टपणे ‘ठाकूर – अनुसूचित जमात’ असा उल्लेख करतात. असे असताना केवळ “अॅफिनिटी टेस्ट” (सांस्कृतिक जुळवणी चाचणी) व क्षेत्रीय मर्यादा यावर आधारित दावा फेटाळणे चुकीचे आहे.
न्यायमूर्ती संदिपकुमार सी. मोरे आणि आबासाहेब डी. शिंदे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, अॅफिनिटी टेस्ट ही अंतिम निकष नसून ती केवळ सहाय्यक साधन आहे. विशेषतः जुने विश्वसनीय दस्तऐवज उपलब्ध असतील तर त्यांना प्राधान्य दिले पाहिजे.
तसेच न्यायालयाने नमूद केले की ‘ठाकूर’ आडनाव असलेले सर्वजण एकाच वर्गात मोडत नाहीत, त्यामुळे प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.
न्यायालयाचा अंतिम आदेश:
अर्जदाराची याचिका मंजूर...
स्क्रुटिनी कमिटीचा 2017 चा आदेश रद्द...
अर्जदारास ‘ठाकूर – अनुसूचित जमात’ वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश...
चार आठवड्यांत प्रमाणपत्र देण्याचे आदेश...
या निर्णयामुळे राज्यातील तत्सम प्रकरणांना मोठा आधार मिळणार असून, जुने दस्तऐवज असलेल्या अर्जदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात प्रभावी बाजू मांडून न्यायालयीन लढाई यशस्वी करणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुशांत येरमवार साहेब (मो. 98230 99140) यांचे व याचिकाकर्त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.





0 Comments