सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या शहर व जिल्हाध्यक्ष पदांच्या फेरबदलांची प्रक्रिया सुरू असताना, सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुदीप चाकोते यांच्या नावाची चर्चा रंगत होती. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुदीप चाकोते यांनी आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्टपणे पत्रकारांशी बोलताना जाहीर केले आहे.
जय हिंद आणि वंदे मातरमच्या घोषणेसह त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, “मी शहराध्यक्ष पदासाठी कुठेही कोणतीही मागणी, शिफारस किंवा विनंती केलेली नाही. कार्यकर्त्यांच्या भावना मला समजतात, पण त्यांनी निरीक्षकांसमोर शक्तिप्रदर्शन करून माझ्या नावासाठी आग्रह करू नये.”
चाकोते यांनी यामागील कारणेही स्पष्ट केली. काँग्रेस पक्ष सध्या कठीण काळातून जात असून, अशा वेळी पदापेक्षा संघटन मजबूत करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, “एक व्यक्ती – एक पद” या तत्वाचा आदर करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल/इंडियन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असून, आगामी 2029 च्या निवडणुकांच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे सोलापूर शहराला अपेक्षित वेळ देणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या भूमिकेमुळे सोलापूर काँग्रेसमधील शहराध्यक्ष निवडीची उत्सुकता आणखी वाढली असून, आता पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

0 Comments