Advertisement

Breaking News
Loading...

माळकवठेतील हरवलेली 10 वर्षीय चिमुरडी अवघ्या 7 तासांत सुखरूप सापडली; सोलापूर गुन्हे शाखेची तत्परता... सीसीटीव्हीच्या मदतीने शोधमोहीम यशस्वी; रस्ता चुकलेल्या मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिले...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. 30 मे 2026: सोलापूर शहर गुन्हे शाखेने उल्लेखनीय तत्परता दाखवत हरवलेल्या 10 वर्षीय मुलीचा अवघ्या सात तासांत शोध लावून तिला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

अर्पिता मल्लिकार्जुन बागले (वय 10, मूळ रा. माळकवठे, ता. दक्षिण सोलापूर) ही मुलगी सध्या भवानी पेठेतील बसवनगर परिसरात नातेवाईकांकडे वास्तव्यास होती. 29 मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ती घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांनी गुन्हे शाखेला तातडीने शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तपासादरम्यान मुलगी कुमठा नाका, मंगळवार पेठ, टिळक चौक मार्गे अश्विनी हॉस्पिटलकडे गेल्याचे आढळून आले. त्यानुसार विविध भागांत शोधमोहीम अधिक वेगाने सुरू करण्यात आली.

दरम्यान, मुलगी अश्विनी हॉस्पिटल ते रिमांड होम परिसरात दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर अर्पिता सुरक्षित अवस्थेत आढळून आली.

चौकशीदरम्यान मुलगी रस्ता चुकल्यामुळे घराचा शोध घेत भटकत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तिची ओळख निश्चित करून नातेवाईकांच्या उपस्थितीत सुखरूपपणे त्यांच्याकडे सुपूर्द केले.

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.



Post a Comment

0 Comments