रविवारचा चहा क्रमांक- २०७
"मी म्हणूनच...!!
काही नाती शब्दांची वाट पाहत नाहीत. ती नुसती निभावली जातात - रोज, निमूटपणे, कुठल्याही फलकाशिवाय. तोही असाच निभावत होता. सकाळी चहाचा कप हातात घेण्यापासून रात्री दिवा मालवण्यापर्यंत त्याचं असणं घरात होतंच. पण ते असणं म्हणजे भिंतीवरच्या घड्याळासारखं .चालत राहणार, वेळ दाखवणार, पण त्यासाठी टाळ्या कुणी वाजवत नाही.
कारण त्याचा स्वभावच तसा. 'मौनं सर्वार्थ साधनम्' हे त्याचं ब्रीदवाक्य नव्हतं, तो त्याचा श्वास होता. बायकोच्या नव्या साडीला, मुलाच्या मार्कांना, घराच्या सजावटीला त्याने कधी ओठांवर कौतुक आणलं नाही. याचा अर्थ त्याला दिसत नव्हतं असं नाही. दिसायचं, मनात नोंदही व्हायची. पण त्याच्या लेखी, रोज उगवणाऱ्या सूर्याची पोचपावती कोण देतं? रोज वाहणाऱ्या वाऱ्याचे आभार कोण मानतं? तसंच हे. संसार आहे, चाललाय, मग त्याला शब्दांचं कुंपण कशाला?
पण ती? ती तर वाहणारा झरा होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिचा स्पर्श होता. दारावरच्या तोरणापासून देवघरातल्या समईपर्यंत, पाहुण्यांच्या पानापासून सणांच्या फराळापर्यंत - सगळीकडे तिची नाचरी पावलं उमटलेली. ती थांबलीच नाही कधी. कारण थांबणं म्हणजे घर थांबणं, हे तिला पक्कं ठाऊक होतं. पण या अखंड वाहण्यात तिला एक हुरहूर लागून राहायची. एका शब्दाची, एका कौतुकाच्या नजरेतली ओल शोधणारी. आणि तो शब्द जेव्हा मिळायचा नाही, तेव्हा 'दुसरी असती तर...' हा बांध फुटायचा. तो आक्रोश नव्हता, ती आर्त हाक होती - 'माझं असणं तुम्हाला दिसतंय ना?'
मग एक दिवस, नियतीने निमित्त घडवलं. शस्त्रक्रियेनं तिला अंथरुणाला खिळवलं आणि घराच्या भिंती पहिल्यांदा थरथरल्या. बाहेरून सगळं सुरळीत होतं. डबे येत होते, मुलं कॉलेजला जात होती, तो ऑफिस करत होता. यंत्र चालू होतं. पण यंत्रातला आत्मा मात्र दवाखान्याच्या खोलीत अडकला होता. तेव्हाच कळलं.
देवपूजा करूनही घर प्रसन्न वाटत नव्हतं, कारण त्यात तिच्या हातांची हळद-कुंकवाची ऊब नव्हती. स्वयंपाकघर आवरलेलं होतं, पण तिची फडताळाशी चाललेली लगबग नसल्याने ते मूक झालं होतं. सगळ्यात विचित्र प्रश्न पडले ते टाॅवेलचे. ओला टाॅवेल तसाच खुर्चीवर पडला होता. कालपर्यंत तो आपोआप वाळत जायचा. आज कळलं तो आपोआप नाही, तिच्यामुळे वाळत होता.
एका ओल्या टाॅवेलने त्याच्या मौनाचा बांध फोडला. त्याला उमगलं - ती 'कामं' करत नव्हती. ती 'घर' विणत होती. प्रत्येक गोष्ट, मग ती दुधावरची साय काढणं असो की मशीनचे कपडे वेगळे करणं असो, त्या प्रत्येक कृतीत तिची माया गुंफलेली होती. हे कर्तव्य नव्हतं, हा 'मायाधर्म' होता. समाजाने तिला 'गृहिणी' म्हटलं, पण ती तर त्या घराची 'गृहदेवता' होती. आणि देवतेची पूजा केली नाही तरी चालते, पण तिच्या अस्तित्वाची जाणीव तरी ठेवावी लागते.
त्या दिवशी त्याने ठरवलं. दवाखान्यात जाऊन तिच्या थकलेल्या कपाळावर हात ठेवायचा आणि सांगायचं 'तू आहेस म्हणून हे घराचं घरपण आहे. तुझ्या नुसत्या असण्यात आमची सगळी निश्चिंतता दडलीय. ही घे तुझ्या रोजच्या दिसण्याची, झिजण्याची, वाहण्याची पोचपावती.'
कारण आता कळलं होतं. काही गोष्टी समजायला निमित्त लागतं. आणि काही निमित्तं आयुष्यभर पुरतात. गोष्ट छोटीच असते एक वाळत घातलेला टाॅवेल, एक थँक्यू, एक मायेचा स्पर्श. पण त्याचा परिणाम? तो डोंगराएवढा असतो. तो घराला घरपण देतो.
'दुसरी असती तर...' या प्रश्नाचं उत्तर आज त्याला मिळालं होतं. दुसरी असती तर कदाचित स्वयंपाक झाला असता, घर आवरलेलं असतं. पण त्या घरात 'जीव' नसता. कारण तो जीव 'ती' होती. फक्त 'ती'.
म्हणूनच, ती असतानाच तिच्या असण्याची पोचपावती देऊन टाकावी. कारण उद्याचं निमित्त कशाला हवं? आजचा थकलेला चेहरा उजळवण्यातच खरी पुण्याई आहे.
प्रा. दिलीपआनंदराव जाधव,सांगली
सचिव
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ,महाराष्ट्र राज्य.


0 Comments