मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे| दि. 30 मे — दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे घरगुती वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपाली रेवणसिद्ध (महांतेश) ऐवळे (वय 23, रा. निंबर्गी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोष सूर्यकांत ऐवळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपी संतोष ऐवळे व त्याचा भाऊ रेवणसिद्ध ऊर्फ महांतेश सूर्यकांत ऐवळे (वय 40) यांच्यात आईने भाजी चांगली बनविली नसल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपीने पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घरासमोर झोपलेल्या महांतेश ऐवळे यांच्या डोक्यावर व तोंडावर जात्याची दगडी गोल पाळी मारून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुरनं. 221/2026 दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटकेत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया जीपीएसआय काशीद यांनी पूर्ण केली.
निंबर्गी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.



0 Comments