Advertisement

Breaking News
Loading...

🚨 सोलापुरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई, 1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दिवसा व रात्री घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणत 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीत भारतनगर, जुना विडी घरकुल परिसरात 22 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. याबाबत अंबादास मधुकर पल्ली यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 333/2026 दाखल करण्यात आला होता. तसेच 13 ते 14 मार्च दरम्यान याच परिसरात दुसऱ्या घटनेत घरफोडी करून लॅपटॉप चोरी झाल्याची नोंद गुन्हा क्रमांक 569/2026 म्हणून झाली होती.

या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शास्त्रीनगर, बसस्थानक क्रमांक 2 जवळ संशयितरित्या चोरीचे सोने विक्रीसाठी थांबलेल्या आरोपीस सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेला आरोपी दिपक वैकुंठ श्रीगण (वय 23, रा. भारतनगर, जुना विडी घरकुल, सोलापूर) याने चौकशीत दोन्ही घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून 16 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत 96,000 रुपये) तसेच MSI Modern 14 Intel कंपनीचा लॅपटॉप (किंमत 23,000 रुपये) असा एकूण 1,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा घरफोडी प्रकरणातील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सोलापूर शहरासह इतर जिल्ह्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, अनिल जाधव, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, उमेश पवार, महेश पाटील तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.



Post a Comment

0 Comments