रविवारचा चहा क्रमांक- २०९
निस्वार्थ मैत्री
मित्र. फक्त दोन अक्षरांचा शब्द. पण त्याचा अर्थ? तो मोजायला गेलो तर हे विश्वही अपुरं पडेल. काही नाती रक्ताची असतात, काही व्यवहाराची, काही जबाबदारीची. पण मैत्री? मैत्री हे एकमेव नातं आहे जे आपण स्वतःच्या मर्जीने, स्वतःच्या आवडीने, आणि फक्त मनापासून जुळवतो. इथे कुठलीच सक्ती नसते. कुठलीच अपेक्षा नसते. असतो तो फक्त निरपेक्ष भाव, आणि एकमेकांसाठी काहीही करायची तयारी.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते जी नात्यांच्या सगळ्या व्याख्या मोडीत काढते. ती फक्त 'मित्र' नसते. ती आपली आण असते, बाण असते, शान असते. प्रसंगी आपला आरसा असते आणि प्रसंगी आपली ढाल. आपण आरशात पाहून स्वतःला सावरतो, आणि ढालीच्या आडून जगाशी लढतो. असा एकतरी जिवलग मित्र प्रत्येकाच्या वाट्याला यावाच. कारण ज्याच्या आयुष्यात खरा मित्र नाही, त्याचं आयुष्य म्हणजे सुगंध नसलेलं फूल. दिसायला सुंदर, पण जवळ जावंसं न वाटणारं.
या जिवलग मित्रांना आपण 'काय झालं?' हे सांगावं लागत नाही. आपल्या चेहऱ्यावरची एक बारीकशी आठीही त्यांना पुरते. आपला आवाज ऐकूनच त्यांना कळतं की आज आपण आनंदात आहोत की आतून तुटलो आहोत. आपल्या घरचे प्रॉब्लेम्स, ऑफिसमधला ताण, प्रेमातला गुंता, किंवा भविष्याची चिंता – ज्या गोष्टी आपण जन्मदात्या आई-वडिलांपाशीही बोलू शकत नाही, त्या आपण त्याच्यापुढे मोकळेपणाने रित्या करतो. कारण आपल्याला माहीत असतं, इथे आपली 'जजमेंट' होणार नाही. इथे फक्त समजून घेतलं जाईल.
आयुष्य म्हणजे एक वादळ. कधी सुखाचं, कधी दुःखाचं. आणि या वादळात जेव्हा आपली होडी डगमगायला लागते, पायाखालची वाळू सरकायला लागते, तेव्हा अचानक पाठीवर एक खंबीर हात येतो. तो हात धरतो, सावरतो आणि कानात फक्त तीन शब्द सांगतो, "मी आहे ना".
फक्त तीन शब्द. पण त्यात हजार हत्तींचं बळ असतं. त्या एका वाक्याने काळजातली भीती कुठल्याकुठे पळून जाते. वाटतं, संपूर्ण जग जरी विरोधात उभं राहिलं तरी चालेल, हा एकटा माझ्यासोबत आहे ना, मग झालं. हे ऐकल्यावर मिळणारा दिलासा एखादा किल्ला जिंकल्यासारखा असतो. कारण तो दिलासा पैशाने विकत घेता येत नाही, तो फक्त कमवावा लागतो.
अशा मित्रात 'माझं-तुझं' कधीच नसतं. त्याची बाईक म्हणजे आपली बाईक, त्याचा पगार म्हणजे आपला पगार. कधी अडचणीत हक्काने त्याच्याकडे हात पसरला, तर तो उलट आपल्यावरच खेकसतो, "अरे वेड्या, माझं सगळं तुझंच आहे. परत असं विचारलंस तर बघ". या खेकसण्यातही प्रेम असतं. अधिकार असतो. आणि आपलेपणा असतो. तो देताना हिशोब करत नाही, आणि आपण घेताना संकोच करत नाही. कारण दोघांनाही माहीत असतं, हे देणं-घेणं नाही, ही फक्त वाटणी आहे. सुखाचीही आणि दुःखाचीही.
या नात्यातला सगळ्यात सुंदर भाग म्हणजे विश्वास. हा विश्वास काचेसारखा नाजूक नसतो, तो दगडासारखा भक्कम असतो. बाहेरच्या जगाने त्याच्याबद्दल हजार वाईट गोष्टी सांगितल्या तरी आपली श्रद्धा डळमळीत होत नाही. उलट आपणच त्याच्या बाजूने लढायला उभे राहतो. ठामपणे सांगतो, "तो कसा आहे हे मला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ठाऊक आहे. तू आधी तुझं बघ". हा विश्वास एका दिवसात निर्माण होत नाही. तो वर्षानुवर्षे, एकमेकांच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहून, एकमेकांसाठी उभं राहून कमावलेला असतो.
जिवलग मित्र म्हणजे आपलं 'सेकंड व्हर्जन' असतं. आपल्यातलेच अवगुण त्याच्यात, आणि त्याच्यातलेच गुण आपल्यात. आपण चुकलो की तो कान धरतो. पण जगासमोर मात्र तो आपली ढाल बनून उभा राहतो. तो म्हणतो, "माझ्या मित्राला बोलण्याचा अधिकार फक्त मलाच आहे, बाकीच्यांनी गप्प बसावं". या अधिकारातच मैत्रीची खरी श्रीमंती दडलेली आहे.
आजच्या 'फास्ट' जगात सगळंच 'इन्स्टंट' झालंय. इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट कॉफी, आणि इन्स्टंट फ्रेंड्सही. सोशल मीडियावर हजारो 'फ्रेंड्स' आणि 'फॉलोअर्स' असतात. वाढदिवसाला शेकडो शुभेच्छा येतात. पण रात्रीच्या दोन वाजता रडायला खांदा हवा असेल, तर यातले किती जण खरंच धावून येतील? म्हणूनच गर्दीतला मित्र आणि काळजातला मित्र यातला फरक ओळखता आला पाहिजे. गर्दी आयुष्यभर पुरत नाही, पण एक जिवलग मित्र सात जन्म पुरतो.
म्हणून सांगतो, आयुष्यात बाकी काही कमवा किंवा नका कमवू, पण एक सच्चा, निस्वार्थी मित्र नक्की कमवा. गाडी-बंगला, पैसा-अडका ही सगळी श्रीमंती काळासोबत ओसरून जाते. पोरंबाळं मोठी होऊन आपापल्या जगात रमून जातात. शेवटी उरतो तो फक्त हा मित्र. म्हातारपणीच्या संध्याकाळी कट्ट्यावर बसून, जुन्या आठवणी काढत, एकमेकांना हसवणारा आणि हसता-हसता डोळ्यातलं पाणी लपवणारा मित्र.
आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा यमदूत येईल आणि विचारेल, "सांगा, काय कमावलंत या जन्मात?" तेव्हा कपाळावरची आठी थोडी सैल करून, ओठांवर एक शांत हसू आणून सांगता आलं पाहिजे, "देवाघरी जाताना रिकाम्या हाताने नाही जात आहोत. एक ठेवा घेऊन जातोय. माझ्या जिवलग मित्राची निस्वार्थ मैत्री. हीच माझी खरी कमाई, जी शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत होती, आणि आता पुढल्याही जन्मात सोबत असेल."
कारण शेवटी हेच खरं. बाकी सगळं इथेच ठेवून जायचंय. सोबत येणार असतील तर फक्त आठवणी. आणि त्या आठवणींना सुगंध देणारा एक जिवलग मित्र.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली
सचिव,
सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य


0 Comments